आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सर्वाधिक’ लाभांसाठी भारतात लीगचे पेव; जागतिक क्रीडा लीगची भारतात प्रचंड गुंतवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीयांची टेलिव्हिजन पाहण्याची क्षमता लक्षात घेऊन जागतिक क्रीडा लीगची २०१२ ते २०१५ या कालावधीत भारतात प्रचंड गुंतवणूक झाली. आय पी एलने भारतीय क्रीडा क्षेत्राची टेलिव्हिजनवर बाजारपेठ काबीज केली आहे असे वाटत असतानाच हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, फुटसॉल, बास्केटबॉल, प्रोफेशनल कुस्ती, गोल्फ यांच्याबरोबरच प्रो कबड्डीनेही मैदानात उडी घेतली आणि क्रिकेटची लोकप्रियतेची बाजारपेठ निम्म्यावर आणून ठेवली. आज टेलिव्हिजन रेटिंग जाहीर करणाऱ्या विविध संस्थांनी क्रिकेटकडे ५१ टक्केच भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येचे बाजारपेठ असल्याचे निदान केले आहे. उर्वरित ४९ टक्के बाजारपेठ प्रो कबड्डीसारख्या देशी खेळाबरोबरच आय लीग फुटबॉल, सुपर फाइट लीग, प्रीमियर बॅडमिंटन, हॉकी इंडिया लीग, प्रो रेसलिंग आदींनी काबीज केली आहे. या यशाने प्रोत्साहित होऊन आगामी दोन वर्षांच्या काळात चॅम्पियन्स पोलो लीग, ई-स्पोर्ट््स लीग, पोकर लीग, इंडियन बीच व्हॉलीबॉल लीग, सेलिंग लीग बॉक्सिंग आणि बिलियर्ड््स लीग या नव्या लीगची भारतात भर पडणार आहे.  


क्रिकेटपेक्षाही कमी वेळ आणि कमी जागेत खेळता येणाऱ्या विविध खेळांच्या लीगला सध्या अधिक मागणी आहे. आयोजक, त्या खेळाच्या संघटना आणि टेलिकास्ट करणाऱ्या टीव्ही कंपनीला प्रत्यक्षात प्रेक्षक किती येतात त्यापेक्षाही टेलिव्हिजनवर किती प्रेक्षक लाभतात ही संख्या अधिक व्यवहार्य वाटू लागली आहे.  


याचे प्रमुख कारण म्हणजे, जाहिरातींच्या माध्यमातून विविध ब्रँड्स अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्याचे उत्तम, स्वस्त आणि सहज सुलभ साधन म्हणजे, कोणत्याही खेळाच्या लीगचे आयोजन, देशी खेळाच्या नावावर नटनट्यांना हाताशी धरून प्रो कबड्डीच्या माध्यमाद्वारे ‘स्टार’ने व्यापक टेलिव्हिजन प्रेक्षक संख्या प्राप्त केली. तोच प्रकार आता पोकर बिलियर्ड््स, ई-स्पोर्ट््स, पोलो, सेलिंग बीच व्हॉलीबॉल आदी खेळांना हाताशी धरून येत्या दोन वर्षांत केला जाणार आहे.  अशा लीगच्या माध्यमाद्वारे होणारे लाभ पुष्कळ आहेत. प्रत्येक खेळाची क्षमता आहे त्यानुसार त्याला क्रीडा व्यासपीठ मिळते. खेळाडू, आयोजक संघटना, पदाधिकारी यांना पैसाही मिळतो. लीगमुळे क्रीडा साहित्य, क्रीडापटूंची वस्त्रप्रावरणे, बूट व अन्य साधने यांच्या विक्रीची बाजारपेठ प्रचंड आहे. त्या त्या देशाच्या राज्याचा स्पर्धेच्या ठिकाणचा पर्यटन व्यवसाय वाढतो. हॉटेल उद्योगालाही चालना मिळते.

बातम्या आणखी आहेत...