आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report Of Mumbai Thane: Tough Fight In Mumbai Thane, Divya Marathi

मुंबई-ठाण्‍याचा ग्राउंड रिपोर्ट: मुंबईच्या \'ठाणे\'दारीसाठी तीव्र संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, ठाणे परिसरात एकूण ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी ते पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला येथे मनसे आणि भाजपशी कडवी टक्कर द्यावी लागेल, तर काही ठिकाणी युतीच्या फुटीचा लाभही काँग्रेसला होऊ शकतो. शिवसेनेला राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर दावा लावायचा असेल, तर त्यांचे बलस्थान असलेल्या मुंबई आिण ठाणे परिसरातच त्याची पायाभरणी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
* मुंबई उपनगर
शिवसेनेचा कस
मुंबई उपनगर या जिल्ह्यात २६ मतदारसंघ येतात. विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे प्रथमच बोरिवलीमधून िनवडणुकीला सामोरे जात आहेत. मागाठाणेमध्ये भाजपच्या हेमेंद्र मेहता यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या प्रकाश सुर्वे यांच्याशी लढत द्यायची आहे. कांदिवली पूर्व येथे अतुल भातखळकर यांचा शिवसेनेच्या अमोल कीर्तिकर यांच्याशी सामना हाेईल. चारकोपमधून भाजपचे योगेश सागर यांचा मार्ग सुकर आहे. अंधेरीमधून शिवसेनेचे रमेश लटके आणि आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्यात लढत आहे.
माजी महापौर सुनील प्रभू (दिंडोशी), आमदार सुभाष देसाई (गोरेगाव) व रवींद्र वायकर (जोगेश्वरी) यांचा विजय निश्चित मानला जाताे. भाजप नेते आशिष शेलार वांद्रे (प.) हे काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांना कडवे आव्हान देऊ शकतात. कृपाशंकर सिंग (कलिना) आणि नसीम खान (चांदिवली) यांना मात्र जिंकण्यासाठी धडपड करावी लागेल. विलेपार्ले (पू.) मधून कृष्णा हेगडे पुन्हा मैदानात असून त्यांना भाजपच्या पराग अळवणी हे आव्हान देतील. मातोश्री हे ठाकरेंचे निवासस्थान असलेला वांद्रे पूर्व मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवेसनेने बाळा सावंत यांनाच पुन्हा संधी दिली. मात्र, श्रीकांत सरमळकर यांनी बंडखोरी केल्याने सावंत यांना विजयासाठी झगडावे लागेल. विक्रोळीत मनसचे मंगेश सांगळे आमदार आहेत. राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दिना पाटील यांना, तर शिवसेनेने खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपने हा मतदारसंघ "रिपाइं'ला सोडला आहे. येथे तिरंगी लढत होत असून मनसेच्या सांगळे यांचा विजय निश्चित मानला जातो. शीखबहुल मुलुंडमध्ये या वेळी दोघा सरदारांमध्ये लढत आहे. भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांच्याविरोधात काँग्रेसने चरणसिंग सप्रा यांना रिंगणात उतरवले आहे, तर शिवसेनेने या भागातील नेते प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिल्याने लढत तिरंगी होईल. भांडूप पश्चिममध्ये मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांचा विजय सोपा आहे. घाटकोपर पश्चिममधील मनसेचे आमदार राम कदम या वेळी भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. त्यांना पाडण्यासाठी राज ठाकरे ताकद पणाला लावणार असले, तरीही कदम यांच्या विजयाची शक्यता आहे. घाटकोपर पूर्वमध्ये गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. भाजपचे आमदार प्रकाश मेहता येथून सलग पाच वेळा विजयी झाले आहेत. काँग्रेसने प्रवीण छेडा या मूळ भाजपमधून आलेल्या स्थानिक नगरसेवकाला येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात या वेळी अटीतटीची लढाई होईल.

मानखुर्द-शिवाजीनगर हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा हा खास मतदारसंघ. या वेळी काँग्रेसनेही युसूफ अब्राहनीच्या रूपाने उत्तर भारतीय तगडा उमेदवार दिला आहे. त्यात पुन्हा "एमआयएम'च्या अल्ताफ काझी यांची भर पडली. मुस्लिम मतविभागणी झाल्यास शिवसेनेचे सुरेश पाटील यांना फायदा होऊ शकतो. अणुशक्तीनगर येथे राष्ट्रवादीचे नवाब मलिक येथील आमदार आहेत. मागच्या वेळी शिवसेनेच्या तुकाराम काटे यांचा येथे निसटता पराभव झाला होता. बौद्ध-मुस्लिम मते अधिक संख्येने असल्याने मलिक पुन्हा बाजी मारू शकतात. चेंबूरमध्ये काँग्रेसचे आमदार चंद्रकांत हंडोरे यांचा सामना डॉन छोटा राजनचे बंधू व रिपाइंचे उमेदवार दीपक निकाळजे यांच्याशी आहे. त्यात हंडोरे पुन्हा बाजी मारण्याची चिन्हे आहेत. कुर्लामध्ये शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांना विजय मिळू शकतो.
- विनोद तावडे प्रथमच रिंगणात
- राम कदमांना पराभूत करण्याचा चंग

* मुंबई शहर
चुरस शिगेला
गतवेळी मुंबई शहरात १० जागांपैकी ६ जागांवर काँग्रेसची सरशी झाल्याचे चित्र होते. दहापैकी दोन मतदारसंघांत मनसे, एकात भाजप आणि एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. धारावी, वडाळा आणि सायन काेळीवाडा मतदारसंघ यंदाही काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता असून वर्षा गायकवाड ,कालिदास कोळंबकर, जगन्नाथ शेट्टी यांना पुन्हा आमदारकी मिळण्याची चिन्हे आहेत. माहिममधून विभागप्रमुख सदा सरवणकर यांना मनसेच्या विद्यमान आमदार नितीन सरदेसाईंचा सामना करावा लागणार आहे.
वरळीत सचिन अहिर यांना पुन्हा विजयाची संधी असून भाजपचे सुनील राणे त्यांना कडवी लढत देतील. शिवडीत पुन्हा एकदा मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकर रिंगणात असून अन्यपक्षीय कमकुवत उमेदवारांमुळे त्यांचा मार्ग सोपा आहे. भायखळ्यात काँग्रेसचे आमदार मधू चव्हाण यांच्यासमोर भाजपचे मधू चव्हाण आहेत.
तर शिवसेनेने आपला उमेदवार न उतरवता अरुण गवळी यांच्या कन्येला म्हणजे गीता गवळींना पाठिंबा दिल्याने लढत रंगतदार होईल. मलबार हिलमधून काँग्रेसने नवख्या सुसीबेन शहांना रिंगणात उतरवल्याने भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढांना विजय सुकर आहे, तर मुंबादेवीत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांना भाजपचे माजी आमदार अतुल शहा विजयासाठी झुंजवतील. कुलाब्यात पुन्हा आमदार अ‍ॅनी शेखर यांनाच उमेदवारी दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जातोय.
- वर्षा गायकवाड यांचा विजय निश्चित
- बाळा नांदगावकरांचा विजय सुकर
* पालघर जिल्हा
सारीच नवलाई
ठाण्यापासून नुकताच वेगळा करण्यात आलेला जिल्हा असल्याने जिल्ह्यात सारी काही नवलाई आहे. पालघर हे या जिल्ह्याचे मुख्यालय असून जिल्ह्याचे सरळसरळ दोन भाग असून मुंबईकडे येणारा वसई -विरार हा पट्टा पुढारलेला, तर जिल्ह्याचा उर्वरित भाग काहीसा आदिवासी पट्टा असल्याने मागे पडलेला आहे.
वसईमध्ये ठाकूर कुटुंबाची असलेली दहशत मोडून काढण्याच्या उद्देशाने दोन दशकापासून सर्व प्रकारची लढाई लढत असलेल्या जनआंदोलन पक्षाच्या विवेक पंडितांना या वेळी शिवसेना आणि भाजपानेदेखील पाठिंबा देत माघार घेतली आहे. मात्र, वसई विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हितेंद्र ठाकूर पंडितांविरोधात उभे असल्याने पंडित यांना निवडणूक सोपी जाणार नाही.
नालासोपरामधून हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर पुन्हा यांना शिवसेनेचे शिरीष चव्हाण व भाजपच्या राजन नाईक यांनी आव्हान दिले आहे. बोईसरला विलास तरे (बहुजन विकास आघाडी) कमलाकर दळवी (शिवसेना), जगदीश धुरी (भाजप) अशी तिरंगी लढत होईल.
पालघरला कृष्णा घोडा (शिवसेना) विरुद्ध मनीषा निमकर (बहुजन विकास आघाडी) असा सामना होणार आहे. आदिवासींसाठी राखीव असलेल्या डहाणूत माकपच्या उमेदवाराचा, तर पालघरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांचा, तर विक्रमगढमद्ये भाजप उमेदवार भोये यांचा विजय निश्चित मानला जातोय.
- ठाकूर विरुद्ध पंडित लढत रंगणार
- आदिवासी राखीव जागांमध्ये चुरस
* ठाणे जिल्हा
किल्लेदारीसाठी झगडा
ठाणे शहर आणि परिसर हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला महायुतीच्या फुटीनंतर आपल्याकडे राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. गेल्या विधानसभेत ठाणे शहरातल्या तिन्ही जागा सेनेकडे, तर परिसरातल्या तीन जागा राष्ट्रवादीकडे होत्या.
यापैकी ठाणे शहर मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या रवींद्र फाटक यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे आणि मनसेचे नीलेश चव्हाण हे अगदीच अननुभवी आणि तरुण उमेदवार असल्याने सेनेला फारशी अडचण येणार नाही. ओवळा माजिवडा मतदारसंघात मनसेच्या सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या हणमंत जगदाळेंशी थेट लढत असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. कोपरी पाचपाखाडीत शिवसेनेच्या विद्यमान आमदार एकनाथ शिंदेंना विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर काँग्रेसने दशरथ पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिला आहे. शिवाय ओवेसींच्या एमआयएमने अश्रफ मुलाणींना उमेदवारी देत मुस्लिम वोटबँक खेचून घेण्यासाठी वातावरण निर्मिती करायला सुरुवात केल्याने आव्हाडांसाठी या वेळी विजय तितकासा सोपा नसेल. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गणेश नाईक आणि संदीप नाईक या पितापुत्रांचा विजय निश्चित मानला जातोय.
भिवंडीमध्ये "सपा'चे विद्यमान आमदार अब्दुल रशीद मोमीन या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. एमआयएम आणि "सपा'च्या उमेदवारीने या मुस्लिमबहुल मतदारसंघात पंचरंगी लढत निर्माण केली आहे. मात्र, खरा सामना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये असून विद्यमान आमदार रशीद मोमीन यांचे पारडे सध्या तरी जड समजले जाते. "सपा'चे राज्यातील सर्वेसर्वा अबू आझमी यांचा भिवंडी पूर्व मतदारसंघ. या वेळी आझमी यांचा मुलगा फरहान या वेळी सपाचा उमेदवार आहे. एमआयएमने येथे अक्रम खान हा तगडा उमेदवार दिला आहे. मुस्लिम मतांतील विभागणीमुळे पुन्हा शिवसेनेच्या म्हात्रे यांची येथून लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
मुरबाड या मतदारसंघात किसन कथोरे हे विद्यमान आमदार राष्ट्रवादी सोडून भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने गोटीराम पवार यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने वामन म्हात्रेंना उमेदवारी दिलीय, तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार व नगरसेवक कॅप्टन आशिष दामले हेही रिंगणात आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होईल.
अंबरनाथ शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा विजय जवळपास निश्चित आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे विद्यमान आमदार रमेश पाटील यांना शिवसेनेचे सुभाष भोईर यांचे आव्हान आहे. भाजपचे उमेदवार रमेश म्हात्रे यांनी ऐनवेळेस रिंगणातून माघार घेत भोईर यांना पाठिंबा दिल्याने सेनेचे पारडे येथे जड आहे. कल्याणपूर्व मतदारसंघात तिरंगी लढत होईल.
कल्याण पश्चिममद्ये काट्याची लढत अपेक्षित आहे. मनसेचे विद्यमान आमदार प्रकाश भोईर यांना शिवसेनेचे विजय ऊर्फ बंड्या साळवी, काँग्रेसचे सचिन पोटे यांचे कडवे आव्हान असेल. तिघेही उमेदवार बलाढ्य मानले जातात. उल्हानगरात भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती पप्पू कलानी यांचे आव्हान असेल.
डोंबिवली या मतदारसंघात भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या विजयाची शक्यता आहे. या भागात कोकणी व आगरी मतदार निर्णायक आहे असून शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, मनसेचे हरिश्चंद्र पाटील, काँग्रेसचे संतोष केणे हे आगरी उमेदवार दिल्याने मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपच्या उमेदवाराचा मार्ग सुकर झाला आहे.
- प्रताप सरनाईक यांना आव्हान
- ‘एमआयएम’ धक्का देण्याच्या तयारीत