आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Girish Bapat Is A President Of Pmrda

पुणे: पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे \'पीएमआरडीए\'चे अध्यक्षपद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे व परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी नियोजित पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे अध्यक्षपद पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री बापट यांच्यावर आता संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी येऊन पडली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असतानाच पीएमआरडीएची स्थापना करण्याबाबत हालचाली झाल्या होत्या. मात्र, त्याचे अध्यक्षपद कोणाकडे असावे यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद होते. त्यामुळे पीएमआरडीएची स्थापनाच रखडली होती.
पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरामध्ये मोठ्या विकास प्रकल्पाची आखणी करणे, मेट्रो, बीआरटी, रिंगरोड याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेणे, राज्य पातळीवरील विषय तातडीने मार्गी लावणे पीएमआरडीएमुळे शक्य होणार आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होण्यात पीएमआरडीएची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, लोणावळा आणि हिंजवडी यासह पुण्याच्या चौफेर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मुंबईच्या 'एमएमआरडीए'च्या धर्तीवर पीएमआरडीएची स्थापना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएच्या स्थापनेची घोषणा केली. अखेर बुधवारी सायंकाळी त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. मुंबईच्या 'एमएमआरडीए'चे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे ठेवले होते. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातही 'पीएमआरडीए'चे अध्यक्षपद कुणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता होती. अधिसूचनेनुसार पालकमंत्र्यांकडे पीएमआरडीचा कारभार सोपविण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या प्राधिकारणामध्ये 25 सदस्य असतील. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे महापौर व आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, मावळ, हवेली, भोर, दौंड, शिरूर, मुळशी, खेड, तळेगाव, लोणावळा, आळंदी नगर परिषदांचे सभापती व मुख्याधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, जमाबंदी आयुक्त याचे सदस्य असतील. नगररचना विभागाचे सहसंचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हे पीएमआरडीएचे सदस्य सचिव असणार आहेत. पीएमआरडीमधून लष्कराच्या अधिपत्याखालील पुणे, देहू व खडकी कॅन्टोन्मेंट वगळण्यात आले आहे.