मुंबई - सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेल्या गुजरात लाॅयन्सने नवव्या सत्राच्या अायपीएलमध्ये शनिवारी विजयाची हॅट्ट्रिक नाेंदवली. गुजरातने लीगमधील अापल्या तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ३ गड्यांनी मात केली. यासह गुजरातने तिसरा विजय मिळवला.
अॅराेन फिंचच्या (नाबाद ६७) झंझावाती फलंदाजीच्या बळावर गुजरातने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद १४३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात गुजरातने ७ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. कर्णधार रैनाने २७, नाथने १२ धावांचे याेगदान दिले. मुंबईकडून मॅक्लीनघनने ४ गडी बाद केले.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने शनिवारी घरच्या मैदानावर कमकुवत फलंदाजीचे दर्शन घडवले. साउथीने २ षटकारांसह ११ चेंडूंत २५ धावा फटकावल्या. क्रुणालने २० धावा काढल्या. कप्तान रोहित शर्माला धवल कुलकर्णीने आपल्या पहिल्याच षटकात बाद केले आणि मुंबईची फलंदाजी अगदीच दुबळी बनली. हार्दिक पंड्या (२), पोलार्ड (१), अंबाती रायडू (१९ चेंडूंत २० धावा), बटलर (२१ चेंडूंत १६ धावा) या अपयशी फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या चुकीच्या संघनिवडीवर शिक्कामोर्तब केले.
फिंचचे सलग तिसरे अर्धशतक : गुजरातचा अॅराेन फिंच झंझावाती फलंदाजी करत अाहे. त्याने सलग तीन अर्धशतके ठाेकली. त्याने पंजाब (७४), पुणे (५०) व अाता मुंबईविरुद्ध (नाबाद ६७) धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : ८ बाद १४३ धावा,
गुजरात लाॅयन्स : ७ बाद १४७.