आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujrat Chief Minister Narendra Modi Will Become Prime Minister Of Nation Swami

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील - सुब्रमण्यम स्वामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणार असून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा वादग्रस्त वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात केला. तसेच डॉ. मनमोहनसिंग हे केवळ काळजीवाहू पंतप्रधानपदाची जबाबदारी निभावत असल्याची टीकाही त्यांनी केली.


मधू देवळेकर लिखित ‘वेक अप ऑर पेरिश’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी पद्मश्री पुरस्कार विजेते मुझफ्फर हुसेन, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते. स्वामी म्हणाले, सध्याचे सरकार बदलायला हवे, असे एकदा लोकांना वाटले की, त्यांच्यासमोर भाजप व त्याच्या मित्रपक्षांशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे मोदी यांना पंतप्रधानपदापासून कोणीही रोखू शकणार नाही. शिवसेना, अकाली दल आदी मित्रपक्षांच्या मदतीने भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला 300 जागा सहज मिळतील. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रवेश शुल्क आकारण्यात गैर नसल्याचे सांगत हे पैसे लोक स्वखुशीने देत असल्याचा दावाही स्वामी यांनी केला.


राहुलमुळे भाजपचा फायदा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात बुद्दू म्हटले जाते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या युवराजांची खिल्ली उडवली. राहुल यांच्याकडे अद्याप इटलीचे नागरिकत्व असल्याने ते पंतप्रधान बनू शकत नसल्याचा आरोपही केला. ते ज्या ज्या ठिकाणी फिरतील तिथे भाजपचा दुप्पट फायदा होईल. त्यामुळे त्यांनी शक्य असेल तिथे सर्वत्रच सभा घ्याव्यात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान करून दाखवण्याचे आव्हानही त्यांनी या वेळी काँग्रेसला दिले.
पूर्वाश्रमीच्या जनता पार्टीचे प्रमुख असलेल्या स्वामी यांनी अलिकडेच आपला पक्ष भाजपमध्ये विलिन केलेला आहे.