आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूदास कामतांची नाराजी दूर? राजकीय संन्यासानंतर प्रथमच पक्ष कार्यालयात हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या अंधेरीतील कार्यालयात हजेरी लावत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. - Divya Marathi
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या अंधेरीतील कार्यालयात हजेरी लावत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या अंधेरीतील कार्यालयात हजेरी लावली. तसेच कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा केली. राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा मागील आठवड्यात गेल्यानंतर कामत यांनी प्रथमच पक्ष कार्यालयात हजेरी लावल्याने त्यांचे बंड शमल्याचे मानले जात आहे. कामत यांनी राजकीय संन्याशाची घोषणा केल्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कामत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच त्यांची नाराजी समजून घेतली होती. यासोबतच कामतांशी सोनियांचे सल्लागार अहमद पटेल आणि ए. के. अॅन्टोनी यांनीही कामत यांच्याशी चर्चा केली होती.
गुरुदास कामत यांनी आज दुपारी अंधेरीतील पक्ष कार्यालयात हजेरी लावली. यावेळी राजहंस सिंह, चंद्रकांत हंडोरे, राजन सिंह, निजामुद्दीन रायन, अमरजीत सिंह मन्हास, बलदेवसिंह खोसा, शीतल म्हात्रे, देवेंद्र आंबेरकर, शिवाजी सिंह चौहान आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते. कामत यांनी त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. मात्र, माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही तसेच येथे आलेल्या पत्रकारांनाही 'ऑफ द रेकॉर्ड' भेटणार नाही असे कामत यांनी सांगितले.
मुंबई काँग्रेस अध्यक्षचे संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळूनच कामत यांनी राजकीय संन्यास्त्राचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले गेले. त्यामुळे संजय निरुपम यांच्याविरोधात काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदारांनी दंड थोपटले. गुरुदास कामत यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळूनच राजकारणातून संन्यास घेतल्याची भावना त्यांच्या समर्थकांची झाली. कामतांच्या समर्थनार्थ मुंबईतील तब्बल 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती.
गुरूदास कामत यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे या मागणीसाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी नरिमन पॉइंट येथील काँग्रेस कार्यालय, गांधीभवनसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. काँग्रेस हायकमांडने गुरुदास कामत यांच्याबाबत योग्य निर्णय घेतला नाही आणि त्यांनी आपला राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय कायम ठेवल्यास कामतसमर्थक हजारोंच्या संख्येने आपले राजीनामे देताल अशी धमकी हायकमांडला दिली होती. अखेर पक्षाला या सर्व घडामोडीची दखल घ्यावी लागली.
मुंबई काँग्रेसमध्ये आता देवरा गट, कामत गट, प्रिया दत्त गट आणि निरुपम गट अशी गटातटात विभागणी झाली आहे. संजय निरुपम अध्यक्ष झाल्यानंतर माजी खासदार प्रिया दत्त यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला. निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर प्रिया दत्तही नाराज असून त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. यातूनच काही महिन्यांपूर्वी निरुपमसमर्थक अस्लम शेख आणि दत्तसमर्थक नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. कामत व दत्त गटांचा विरोध असल्याने आगामी काळात संजय निरूपम यांची उचलबांगडी होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...