आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Aid News In Marathi, Chief Secretary J.S.Sahariya, Divya Marathi

गारपीटग्रस्तांना आज मदत जाहीर होणार, मुख्‍य सचिव जे.एस. सहारिया यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय मंत्रिगटाची बैठक बुधवारी होणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गारपीटग्रस्तांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी दिली. वारंवार होणा-या गारपिटीमुळे काही ठिकाणचे पंचनामे पुन्हा पुन्हा करावे लागत असल्याने मदतीला उशीर होत असल्याची कबुलीही सहारिया यांनी दिली.


केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात ही विशेष मंत्रिगटाची बैठक होत आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळीच वाढीव मदतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून लवकर शेतक-यांना वाढीव मदत दिली जाईल, अशी माहितीही मुख्य सचिवांनी दिली.


साडेसतरा लाख हेक्टरला फटका : आतापर्यंत साडेसतरा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावरचा नुकसानीचा आढावा घेतला गेला आहे. उर्वरित साधारण अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्राचा आढावा घेण्याचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.


आचारसंहितेचा अडथळा
मृत व्यक्ती, मृत जनावरे आणि घरांच्या पडझडीबाबत स्थायी आदेशानुसार मदत देण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे वाढीव मदत मिळण्यास विलंब होतो आहे, अशी कबुलीही मुख्य सचिवांनी दिली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला असून मध्य प्रदेशात नुकसानीचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षाही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

‘रोटरी क्लब’लावून देणार आपतग्रस्त पाल्यांचे विवाह
मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर भागांत झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णत: कोलमडली असून घरातील शुभकार्येही लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे. अशा संकटग्रस्तांसाठी रोटरीने मदतीचा हात पुढे केला असून गारपीटग्रस्तांच्या पाल्यांच्या शुभमंगलाची जबाबदारी या संघटनेने स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.


तळेगाव दाभाडे येथील रोटरीचे अध्यक्ष अशोक पवार म्हणाले, आमच्या संघटनेतर्फे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे होतात. यात सहभागी होणा-या जोडप्यांच्या लग्नाचा सर्व खर्च क्लबतर्फे केला जातो. पोशाख, संसारोपयोगी वस्तू, सिलिंडरसह गॅस कनेक्शनही भेट म्हणून दिले जाते. नऊपेक्षा अधिक जोडप्यांनी नोंदणी केल्यास त्या भागात जाऊनही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचीही आमची तयारी आहे. येत्या दोन महिन्यांत अनेक मुहूर्त आहेत. अशा परिस्थितीत ठरलेले कार्य लांबणीवर टाकण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आम्ही या विवाह सोहळ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत आहोत. इच्छुकांनी त्यासाठी 9822437987 किंवा 9422311225 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.