आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वाचवा, महायुतीची राज्यपालांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, मका, ज्वारी, कापूस इत्यादी पिके तसेच संत्रा, केळी, द्राक्ष या फळपिकांबरोबर भाजीपाल्याची नासधूस झाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यपालांनीच आत आपणच वाचवा, अशी मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेऊन केली. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलून नक्कीच शेतकर्‍याला दिलासा दिला जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळास दिले.


गारपिटीने 20 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 28 व्यक्तींचा मृत्यू झाला, वेळेवर मदत न मिळाल्याने 39 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सरकारने त्यांना मदत दिली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते, भाजप प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार नीलम गोर्‍हे, आमदार बाळा सावंत, आशिष शेलार, प्रकाश शेंडगे आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन शेतकर्‍यांना 15 हजार कोटी मदतीची मागणी केली.


भरीव मदत द्या : गोपीनाथ मुंडे
गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने 4 हजार कोटी रुपयांची केलेली मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पुरती निराशा झाली असून ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर करून केंद्र सरकारकडून भरघोस मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली.


कर्जाची व्यवस्था करा : देसाई
गारपिटीने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारी मदत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतीसाठी नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई म्हणाले.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्या
0कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये
0बागायती शेतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये
0पीक कर्ज माफीसाठी 5 हजार कोटी रुपये
0शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे
0वर्षभराचे वीज बिल माफ करण्यात यावे
0जाहीर केलेल्या मदतीचे वाटप तत्काळ सुरू करा