आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm News In Marathi, Nanded, Vidarbh, Nashik, Unseasonal Rain

नांदेडात पाव किलोच्या गारा; विदर्भासह नाशकातही पाचव्या दिवशी गारपीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सलग पाचव्या दिवशी महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस व गारपिटीचा अस्मानी प्रकोप बरसला. गुरुवारी नांदेड, लातूर, बीड, जालना, नाशिक आणि वाशीमला वादळी पावसासह गारपिटीने जोरदार तडाखा दिला. याशिवाय अनेक जिल्ह्यांत वादळी वारे, रिमझिम पाऊस व हवामान ढगाळ होते. निसर्गाच्या तडाख्यात उभी पिके आडवी झाल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात पडलेल्या गारांचे वजन पाव-पाव किलो होते.


मराठवाडा : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याला गुरुवारी पुन्हा गारपिटीने झोडपले. आधीच्या तडाख्यात जिल्ह्यात 42 हजार हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नायगाव, बिलोली, कंधार, लोहा तालुक्यांत सायंकाळी दीड तास वादळी पाऊस व आंब्याच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. काही ठिकाणी पाव किलो वजनाच्या गारा कोसळल्या. यात 9 जण जखमी झाले. लातूर जिल्ह्यातील अनेक गावांत सलग तिसºया दिवशी गुरुवारी पहाटे गारपीट झाली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वादळी पावसासह गारपीट झाली.
नाशिक : शहरात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गारांसह मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे निफाड, चांदवड, दिंडोरी व सिन्नर तालुक्यात सुमारे 6 हजार 853 हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झालेले आहे.
वाशीम : जिल्ह्यात बुधवारी रात्री अनेक गावांमध्ये गारांसह वादळी पावसात रब्बी पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. संत्रा बागेतील फळे आणि आंब्यांचा मोहर गळून गेला आहे.

सहा दिवसांत मदत जाहीर करू : कदम
गारपिटीमुळे मराठवाडा, विदर्भातील रब्बी पिके, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. आधी अतिवृष्टी व आता गारपिटीमुळे राज्यासाठी हे संकट वर्ष ठरले. पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू असून कॅबिनेटसमोर अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाई जाहीर करण्यात येईल. साधारण पाच ते सहा दिवसांत हा निर्णय होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली. ‘दिव्य मराठी’शी बोलताना पतंगराव म्हणाले, नागपुरात मी स्वत: अंदाज घेतला तेव्हा संकटाची कल्पना आली. गारपीट अजूनही सुरू असल्याने पंचनाम्यांत अडचण येत आहे. बीडमध्ये स्थिती भीषण होती.
नियमानुसार मदत : हे नुकसान नैसर्गिक असून मदत देताना निवडणूक आचारसंहितेची अडचण नाही. नियमांवर बोट ठेवून ही मदत देऊ, असे पतंगरावांनी ठासून सांगितले.
पतंगराव कदम, मदत व पुनर्वसन मंत्री


जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
उत्तर महाराष्ट्र
०नाशिक : 11,081
०नंदुरबार : 254
०धुळे : 37,788
०जळगाव : 37,402
मध्य महाराष्‍ट्र
०पुणे : 3,142 ०नगर : 6,536 ०सोलापूर : 31,775 ०सातारा : 417
विदर्भ
०यवतमाळ : 59,876
०अमरावती : 42,181
०अकोला :14,533
०वाशीम : 5,510
०नागपूर : 43,263
०बुलडाणा : 41,794
मराठवाडा
०औरंगाबाद - 59,643 ०जालना - 22,792
०बीड - 31,503 ०उस्मानाबाद - 23,325
०नांदेड - 4,356 ०परभणी - 75,500 ०हिंगोली - 4,171