आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Relief News In Marathi, Model Code Of Conduct, Divya Marathi

महसूल यंत्रणेने वाढवले राज्यात गारपिटीचे संकट, आचारसंहितेचा बागुलबुवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, महसूल यंत्रणा निवडणुकाच्या कामात व्यस्त आहे. आचारसंहितेचा बागुलबुवा करत पंचनामे करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे राज्यावरील गारपिटीच्या संकटाची तीव्रता अधिक वाढली, असा निष्कर्ष मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेने पाहणी अहवालात काढला आहे.


म्हाळगी प्रबोधिनीने राज्यातील 17 जिल्ह्यांत 9 दिलासा पथके पाठवली होती. 70 पेक्षा जास्त कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासक यांचा यात सहभाग होता. या नऊ पथकांनी 36 तालुक्यांतील 84 गावांची पाहणी केली. त्याविषयीचा अहवाल गुरुवारी पत्रकारांना देण्यात आला. नुकसानग्रस्त शेतक-यांना समुपदेशनाची गरज आहे. त्यासाठी म्हाळगी प्रबोधिनी नि:शुल्क हेल्पलाइन चालू करणार आहे. दिलासा पथकाने बनवलेला अहवाल राज्य शासनाला सुपूर्द करणार असल्याचे प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.


काय आढळले? : द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी, टोमॅटो या फळपिकांना मोठा फटका. गहू, हरभरा, तूर, ज्वारी आणि करडीचा हंगाम पूर्ण वाया. कडबा तसेच शेतचा-याचे मोठे नुकसान.


डॉपलर फेल : राज्यात तीन ठिकाणी डॉपलर रडार केंद्रे आहेत. नागपूरचे डॉपलर दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे. महाबळेश्वरची यंत्रणा केवळ मान्सूनमध्ये कार्यरत असते. मुंबईतील यंत्रणा सुरू आहे. मात्र, त्यातून मिळणारी माहिती तालुका आणि गावपातळीपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा नाही.


भट्ट्या उद्ध्वस्त : गारपिटीत वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. या राज्यात अशा वीटभट्ट्यांवर काम करणारे एक लाख मजूर आहेत. ते सर्व मजूर बेकार झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


काय आहेत शिफारशी ?
अल्पभूधारकांना तातडीची मदत म्हणून धान्य देण्यात यावे, चारा छावण्या तत्काळ उभा करण्यात याव्यात, विमा संरक्षण योजनेची व्याप्ती वाढवा, हवामान खात्याची रडार यंत्रे सज्ज ठेवावीत, मनरेगाचे मजूर शेतक-यांच्या दिमतीला देण्यात यावेत, गारपीटग्रस्त जिल्ह्यात दिलासा समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत व पुनर्वसन कार्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात यावी.


असे करा पंचनामे
शेतक-यांचे पंचनामे विश्वासात घेऊन करा. मळणीसाठी तयार ठेवलेल्या पिकांचाही त्यात समावेश करा. शेतक-यांनी पंचनामा अमान्य केल्यास लोक पंचनाम्याचा अवलंब करावा. सर्व पंचनाम्यांना ग्रामसभेची मान्यता घेण्यात यावी. पंचनाम्यात गडबड करणा-या शासकीय कर्मचा-यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे.