मुंबई - प्रख्यात लेखक
चेतन भगत यांच्या ‘
हाफ गर्लफ्रेंड’ची गेल्या वर्षी सर्वाधिक व्रिकी झाली असली तरी अतिशय कमी कालावधीत सर्वाधिक प्रती खपण्याचा विक्रम मात्र क्राइम फिक्शन असलेल्या ‘कुलाबा कॉन्स्पिरसी’ या हिंदी लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांच्या कादंबरीच्या नावावर आहे. २०१४ च्या शेवटच्या केवळ दोन महिन्यांत या कादंबरीच्या तब्बल ३० हजार प्रती वाचकांनी खरेदी केल्या आहेत.
हार्पर कॉलिन्स प्रकाशनातर्फे ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे. देशभरात या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीतील प्रती केवळ चार महिन्यांमध्ये संपल्या. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१४ मध्ये या कादंबरीच्या ३० हजार प्रती खपल्या असून अजूनही हा आकडा वाढतच असल्याने विक्रीच्या वेगामध्ये या कादंबरीने साहजिकच चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ला मागे टाकले आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’च्या केवळ गेल्या वर्षीच्या शेवटच्याच दोन महिन्यांमध्ये १९ हजार प्रती खपल्या होत्या.
३० हजार प्रतींची २ महिन्यांत विक्री
सुरेंद्र मोहन पाठक यांची कादंबरी भारतातील मोठ्या शहरांमधील वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात वाचत आहे. विक्रीचा वेगही प्रचंड आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये तब्बल ३० हजार प्रती विक्री झाल्या होत्या. अजूनही खप सुरूच आहे. : रणबीर कुमार सिंग, मार्केटिंग विभाग, हार्पर कॉलिन्स प्रकाशन, नोएडा, दिल्ली.
दिल्ली सर्वाधिक वाचणारे शहर
अॅमेझॉन डॉट कॉम या ऑनलाइन विक्री करणा-या संकेतस्थळाने नुकताच वाचनासंदर्भात देशभरात सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये दिल्लीमध्ये पुस्तके वाचणा-यांचा आकडा देशातील इतर शहरांपेक्षा सर्वाधिक आहे. त्यानंतर मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि त्यानंतर पुणे या शहरांचा क्रमांक लागतो.