आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंग आंदोलक मंत्रालयात धडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारच्या योजनांमध्ये अपंगांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी लढा देणार्‍या अपंगांनी मंगळवारी थेट मंत्रालयातच धडक दिली. 150 ते 200 च्या संख्येने आलेल्या आंदोलकांनी पहिल्या मजल्यावरील सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या दालनासमोर ठिय्या दिला.

दुपारी चारच्या दरम्यान एक-एक आंदोलक सचिवांच्या दालनासमोर येऊ लागला आणि सगळे जमल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. राज्य सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. घोषणाबाजी ऐकताच पोलीस धावत आले. सचिव आर.डी. शिंदे जागेवर नव्हते, फोन करताच ते लगेच धावत आले आणि त्यांनी अपंगांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

आंदोलकांचा गनिमीकावा : आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन, प्रहार किसान मित्र, शेतकरी संघटनेच्या अपंग कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर धडक मारण्याची योजना आखली होती. एका कार्यकर्त्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या विभागात जायचे असल्याचे सांगून प्रवेशपत्र मिळवले होते. सगळे आतमध्ये आल्यानंतर आम्ही सचिव आर.डी. शिंदे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची आम्ही कोणालाही खबर लागू दिली नव्हती.

अंमलबजावणीच नाही
पाच फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी अपंगांच्या 20 मागण्यांपैकी 15 मागण्या मान्य करण्याचे मंजूर केले होते. नंतर सामाजिक न्याय विभागात 24 एप्रिल रोजी बैठक झाली परंतु अंमलजावणी शून्य असल्याचे सचिव आर.डी. शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ‘आम्ही आदेश दिले आहेत परंतु खालील स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नाही,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.