आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Handicapped Person Not To Need To Go Mumbai For The Certificat

वाहन परवानासाठी अपंगांची मुंबई वारी टळणार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अपंग व्यक्तीला वाहन परवाना मिळवण्यासाठी वैद्यकीय (फिटनेस) प्रमाणपत्र सादर करावे लागते. मुंबईच्या हाजी अली परिसरातील रिहॅबिलिटेशन सेंटरमधूनच हे प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह परिवहन विभागाकडून केला जात होता. त्यामुळे राज्यभरातील अपंगांना मुंबईला खेटे मारावे लागत होते. मात्र अपर परिवहन आयुक्तांनी नुकतेच सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना एक पत्र पाठवून शासकीय रुग्णालयाकडून मिळणारे प्रमाणपत्र त्यासाठी ग्राह्य धरावे, असे आदेश दिले आहेत.


राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अपंग सेलचे राज्य अध्यक्ष सुहास तेंडुलकर व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून प्रमाणपत्र मुंबईतून आणण्याची अडचण दूर करण्याची विनंती केली होती.
राज्यातील प्रत्येक अपंग वाहनधारकाला आपले फिटनेस प्रमाणपत्र काढण्यासाठी मुंबईला जावे लागत असल्याने त्याला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, तसेच आर्थिक नुकसानही होत आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधले. पवारांनी संबंधित अधिका-यांना या विषयात तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. आता जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय मंडळे यांच्याकडून प्राप्त झालेले वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्रही या परवान्यासाठी ग्राह्य धरण्यात यावेत, अशा सूचना अपर परिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत.


राज्यात वैद्यकीय मंडळे कार्यरत
वाहन परवान्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्य वैद्यकीय अधिका-याच्या अध्यक्षतेखाली किंवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केलेले आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात अशी मंडळे स्थापनही केली आहेत. त्यामुळे सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी अपंगांच्या वाहन परवान्यासाठी या मंडळाचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, मुंबईतून प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह धरू नये, अशा स्पष्ट सूचना अपर परिवहन आयुक्तांनी केल्या आहेत.