आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅनोव्हर: \'मेक इन महाराष्ट्र\'शिवाय \'मेक इन इंडिया\' अशक्य- देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन महाराष्ट्रा\' या चर्चासत्रात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई सहभागी झाले. त्यांच्यासमवेत उद्योगसचिव अपूर्व चंद्रा हेही उपस्थित होते. - Divya Marathi
\'इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन महाराष्ट्रा\' या चर्चासत्रात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई सहभागी झाले. त्यांच्यासमवेत उद्योगसचिव अपूर्व चंद्रा हेही उपस्थित होते.
हॅनोव्हर/मुंबई- देशाला 'मेक इन इंडिया' साधायचे असेल तर 'मेक इन महाराष्ट्र'शिवाय ते शक्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना कानमंत्र दिला. माझे सरकार उद्योग जगताला आपले वाटेल असे काम करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना दिला.
'महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी' या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मर्सिडिज बेन्झ या कंपनीला वर्षभर ज्या बाबींसाठी संघर्ष करावा लागला, त्याची पूर्तता आमच्या सरकारने अवघ्या 15 दिवसांत केली. एका कायद्याच्या अर्थामुळे शिंडलर कंपनीची अवघी गुंतवणूक खोळंबली होती. सरकारने त्या कायद्यात 15 दिवसांतच दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ कंपनीला लाभान्वित करण्यासाठी नव्हता, तर त्या कायद्याचे आलेखनच चुकीच्या धर्तीवर होते. यामुळे महाराष्ट्रात 5 महिन्यात आणि देशात 11 महिन्यात आता उद्योग जगताला सरकारे त्यांच्यासाठी आपलुकीची वाटू लागली आहेत. दरम्यान, वोक्सवॅगनचे अध्यक्ष महेश कोडूमुडी यांनी आपल्या भाषणात देशातील सर्वांधिक सहज उपलब्ध होणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा गौरव केला. येथे उपस्थित असलेले अभिनेते विवेक ओबेरॉय यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
जर्मनी येथे सुरू असलेल्या उद्योग-व्यापार मेळाव्यात राज्यातील गुंतवणूक संधींचे व्यासपीठ असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या आकर्षक स्टॉलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. महाराष्ट्रात जर्मन उद्योग चांगली कामगिरी करीत असून आपण महाराष्ट्राला आवर्जून भेट द्यावी, असे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना यावेळी दिले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दोघांचे स्वागत केले.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एसक्यूएस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीला दोन एकर जागा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोमवारी देण्यात आली. या कंपनीने महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आणखी 2000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही जागा देण्यासंबंधीचे पत्र सोमवारीच एसक्यूएसला सुपूर्द केले.
जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ‘हॅनोव्हर मेसी 2015’ या उद्योग-व्यापार मेळाव्यात इंडो-डॅनिश प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी गुंतवणूकदारांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक सर्व उद्योगांचे स्वागतच केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडो-डॅनिश फोरमचे प्रतिनिधी अजय चौहान आणि जवाहरलाल माटू यांना दिले.
चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध गुंतवणूक समुहांशी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री चर्चा करणार आहेत. यामध्ये सोमवारी मर्सिडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जीएसएबी इलेक्ट्रोटेक्निक, फ्लॅन्सचेनवेर्क थाई आदींसोबत बैठका पार पडल्या. यावेळी किर्लोस्कर इंटरनॅशनल पंपचे प्रमुख संजय किर्लोस्कर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पुण्यातील इंजिनिअरींग उत्पादनांच्या वाढीसंदर्भात त्यांनी चर्चा केली. तसेच जी अँड बी मेटल कास्टींग प्रा. लि., इंडो-युएस एमआयएम टेक प्रा. लि. यांच्याशी देखील चर्चा केली. वेस्टाज टर्बाइनला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.
या मेळाव्यात जगातील विविध नामांकित उद्योगसमूह व व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींसह संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील विविध खासगी, सरकारी कंपन्या तसेच अनेक भारतीय उद्योगसमुहांनी आपली उत्पादने प्रदर्शित केली आहेत. भारतीय कंपन्यांनी या मेळाव्यात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान, जर्मनीला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील विविध उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योगांच्या उभारणीसाठी शासन देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'मेक इन महाराष्ट्रा'साठी काय काय प्रयत्न केले....