आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हर्बेरियम’ महोत्सवाची प्रजासत्ताकदिनी सांगता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘केवळ 25 प्रयोग’ अशी अफलातून जाहिरात करणारे सुनील बर्वे यांना ‘हर्बेरियम’च्या अंतर्गत सादर केलेल्या पाचही पुनरुज्जीवित नाटकांना गेल्या वर्षभरात नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने जुन्या पिढीने मनात साठवलेल्या रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा अनुभव ओझरता का होईना नव्या पिढीलाही घेता आला.
हमीदाबाईची कोठी, लहानपण देगा देवा, सूर्याची पिल्ले, आंधळं दळतंय आणि झोपी गेलेला जागा झाला या पाच जुन्या नाटकांचे महाराष्ट्रभर 25 प्रयोग सादर केल्यानंतर आता 22 ते 26 जानेवारीदरम्यान मुंबईत हर्बेरियम महोत्सवाची सांगता होणार आहे. यादरम्यान नाटकांचा शेवटचा प्रयोग होणार असल्याचे अभिनेते सुनील बर्वे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत आलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही महोत्सवाच्या सुरुवातीला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 26 जानेवारीला ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाच्या 25 व्या प्रयोगाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
25 प्रयोगांचा फंडा जितका यशस्वी झाला तितकेच यश ‘हर्बेरियमची सांगता’लाही मिळाल्याचे तिकीट बारीवर लक्षात आले. या पाचही नाटकांचा अगदी शेवटचा प्रयोग पाहण्यासाठी नाट्यरसिकांमध्ये चढाओढ लागली होती. पहिल्याच दिवशी सर्व नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांवर हात हलवत घरी जाण्याची पाळी आली.

सवाई एकांकिका विरुद्ध हर्बेरियम
यंदा सवाई एकांकिका स्पर्धेचेही 25वे वर्ष असल्याने 23 ते 25 जानेवारीदरम्यान अनेक स्तुत्य नाट्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच वेळी नेमके हर्बेरियमचाही महोत्सव आखण्यात आल्याने नाट्यरसिक दुहेरी अडचणीत सापडले आहेत. हर्बेरियमची नाटके पाहावीत की गेल्या 24 वर्षांतील उत्तम एकांकिका पाहाव्यात अशा द्विधा मन:स्थितीत प्रेक्षक सापडले आहेत.