आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्र्यांच्या साखर कारखान्यास स्थगितीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री व त्यांचे इतर नातेवाईक संचालक मंडळावर असलेल्या आष्टी ( ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील औदुंबरराव पाटील खासगी साखर कारखान्याच्या बांधकामाला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली.

न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना कारखान्याला देण्यात आलेल्या परवानग्या योग्य आहेत अथवा नाहीत, याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले होते. जर सर्व परवानग्या योग्य असतील, तर बांधकामाला दिलेली स्थगिती उठवण्यास हरकत नसल्याचेही न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते. नुकत्याच झालेल्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे जिल्हाधिकार्‍यांचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला. परंतु जिल्हाधिकार्‍यांचा अहवाल समाधानकारक नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने बांधकामावरील स्थगिती कायम ठेवली. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने या साखर कारखान्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. हा खासगी कारखाना ज्या जागेवर उभा राहत आहे, तेथून केवळ दीड किमीवर पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. ग्रामस्थ तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. तसेच, पंचक्रोशीतील पंचवीसहून अधिक गावे पाण्यासाठी या तळ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे येथे कारखाना उभा राहिल्यास त्याचे सांडपाणी व मळी या पाण्यात मिसळून तळे प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

अनेक नियमांचे उल्लंघन, परवानग्याही घेतल्या नाही
कारखान्याने अनेक नियमांचे उल्लंघन केले असून आवश्यक परवानग्यादेखील मिळवल्या नाहीत. कारखान्याला देण्यात आलेले एरिअल डिस्टन्स सर्टीफिकेट प्रत्यक्षात दुसर्‍याच जागेसाठी देण्यात आले आहे. तसेच, संबंधित जमीन बिगरशेतीदेखील करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीने कारखान्याविरोधात ठराव केला असूनही त्याचे बांधकाम पुढे रेटण्यात येत आहे, असा आरोप करत ग्रामपंचायतीने या कारखान्याच्या बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.