आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हातभट्टी दारूविरोधात राज्य सरकारची मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अवैध दारूमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने बेकायदा दारूचे उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने आराखडा तयार केला अाहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून नागरिकांना अवैध दारूविरुद्ध मोबाइलच्या माध्यमातूनही तक्रार करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी गांधी जयंतीदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात िदली.

सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अवैध मद्यनिर्मिती व विक्री निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावाच्या सक्षमीकरणासाठी शासनास उपाय सुचवले आहेत. त्यातील अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात मोहीम घेण्याची सूचना होती. त्यांच्या सूचनेनुसार ही मोहीम सुरू करण्यात आली असून गावांच्या सहभागाने अवैध धंद्यांवर आळा बसवण्यात येणार आहे.

अवैध मद्यनिर्मितीला आळा घालण्यासाठी राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. अवैध मद्यनिर्मिती विरोधात तक्रारींसाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्हाॅट्सअॅप क्रमांक व टोल फ्री क्रमांक सुरू केला असून नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे. येथे आलेल्या तक्रारीची दखल संबंधित जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुखांनी तत्काळ घेऊन मिशन मोडवर त्यावर कारवाई करावी. त्यामुळे अशा धंद्यांना जरब बसून अवैध धंदे बंद होतील व कोपर्डीसारख्या घटना रोखता येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णा हजारे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ध्वनिचित्र मुद्रित करून पाठविलेल्या संदेशाचे प्रसारण करण्यात आले.

व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात तक्रारी
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांनी मोहिमेची माहिती दिली. अवैध मद्यनिर्मिती व विक्रीच्या धंद्यांविरुद्ध तक्रारींसाठी सुरू करण्यात आलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावर तातडीने कारवाई करण्यात येत आहे. भरारी पथकांच्या वाहनांना ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात आली आहे. त्यामुळे पारदर्शक कारवाई होण्यास मदत होत असून अवैध धंद्यांतील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...