आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला टक्कर देण्यासाठी आ. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेची सेनेशी युती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी पक्ष असतानाही विरोधकाची भूमिका वठवणाऱ्या शिवसेनेने आपल्या आक्रमक आणि अभिनव आंदोलनांनी भाजपला अडचणीत आणणारे व मंत्रालयातील अधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी वादग्रस्त ठरलेले आमदार बच्चू कडू यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचे ठरवले आहे. ही मैत्री केवळ शेतकरी आंदोलनाबाबत असली तरी भविष्यात निवडणुकीतही त्यांच्यासोबत युती होऊ शकते, असे सांगत शिवसेनेने भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला असून भाजपने चारही बाजूंनी कोंडी केल्याने कडूंनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शिवसेनेचे दार ठोठावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नोटबंदीनंतर शेतकऱ्यांची अवस्था खूप गंभीर असून त्यांच्या शेतमालाला भावही मिळत नसल्याने येत्या १५ डिसेंबर रोजी नागपुरात तर २८ डिसेंबर रोजी अमरावतीत शेतकरी आंदोलन करण्याचे प्रहार या संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी ठरवले आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला असून तेथे शिवसेना अगदी दुबळी आहे. त्यामुळे प्रहारसारख्या संघटनेची साथ मिळाल्यास भविष्यात भाजपला शह देता येईल, असा शिवसेनेचा अंदाज आहे. आपल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी विनंती कडू यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटून केली. ही विनंती शिवसेनेने मान्य केल्याने नागपुरातील मोर्चा लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

युतीचे पर्याय खुले : ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, भविष्यात राजकीय युतीचे सर्व पर्याय खुले असतील. केवळ शेतकरी प्रश्नांवरील आंदोलनास पाठिंबा मागायला आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो, असेही कडू म्हणाले.

संत्रा उत्पादकांचे खूप हाल होत आहेत. पूर्वी ८ लाखांना मागणी असलेली बाग आता २ लाखांना मागितली जात आहे,’’ असे कडू यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...