आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मादाय रूग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; आरोग्य मित्र नेमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गरिबांना 20 टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या नियमाला हरताळ फासणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना लवकरच चाप बसणार आहे. मुंबईतील सर्व धर्मादाय हॉस्पिटलांची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असून प्रत्येक रुग्णालयात आरोग्यमित्र नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबईत एकूण 53 धर्मादाय हॉस्पिटले आहेत. या हॉस्पिटलांना शासनाने सवलतीच्या दरात जमीन, वीज, पाणी दिले आहे. त्याबदल्यात हॉस्पिटलांनी 20 टक्के खाटा गरिबांसाठी राखीव ठेवण्याची सक्ती आहे. परंतु या नियमाला गेली अनेक वर्षे हरताळ फासण्यात येतो, अशा तक्रारी रुग्णांकडून होत होत्या.
अशा हॉस्पिटलांची मनमानी मोडण्याचे शासनाने आता ठरवले आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नेमण्यात येतील. त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

तपासणीत पितळ उघडे
धर्मादाय रुग्णालयात दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला मोफत तर आर्थिक मागासवर्गीयांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा पुरवावी, असा सरकारचा आदेश आहे. परंतु मुंबईतील बहुतांश धर्मादाय हॉस्पिटलांनी या नियमास हरताळ फासला असल्याचे विधिमंडळाच्या समितीच्या तपासणीत आढळून आले होते. मागील पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली होती. त्यामध्ये आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी धर्मादाय रुग्णालयांच्या मनमानीला शासन लवकरच चाप लावेल, अशी घोषणा केली होती.

उशिराचे शहाणपण
आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार सरकारने धर्मादाय हॉस्पिटलांच्या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु राजीव गांधी आरोग्यदायी योजना नोव्हेंबरपासून राज्यात सर्वत्र लागू होत आहे. या योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्येही गरिबांना मोफत उपचार मिळण्याची सोय आहे. त्यामुळे शासनाने धर्मादाय हॉस्पिटलांबाबत विलंबाने घेतलेला निर्णय म्हणजे ‘बैल गेला अन् झोप केला’ असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.