आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नावानेच सुरू राहणार आरोग्य योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युती सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने जुन्या योजना नव्या नावाने आणण्याचा सपाटा लावला. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचाही समावेश होता. महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने जनआरोग्य योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, या योजनेला मुहूर्तच मिळत नसल्याने २१ नोव्हेंबरपासून सुरू होणारी योजना आता मार्च
महिन्यात कार्यान्वित करण्याचा सरकार विचार करत आहे.

७ जून २०१६ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यातिथी वर्षानिमित्त महात्मा फुले जनआरोग्य योजना २ आॅक्टोबर २०१६ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत ही योजना कागदावर असून राजीव गांधी जीवनदायी योजनेवर सरकार समाधानी असल्याचे लक्षात येत आहे.

विद्यमान योजनेअंतर्गत विमा कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारनाम्याची मुदत २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत होती. ही मुदत संपल्यानंतर आता नव्या करारानुसार सरकारकडून प्रतिव्यक्ती विमा रकमेत ३३३ रुपयांवरून ५०१ रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. प्रत्यक्षात योजनेत कोणत्याही नव्या संकल्पनेचा समावेश नाही. तरीही ही वाढ करत सरकार विमा कंपनीवर मेहेरबान झाली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून सुरू करण्यात आली होती. विमा कंपनीच्या साहाय्याने पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यांत ही योजना सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून नॅशनल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली होती.

सदर विमा कंपनीबरोबर केलेल्या सामंजस्य कराराचा कालावधी २० नोव्हेंबर २०१६ रोजी संपुष्टात आला आहे. नव्या करारानुसार नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दरवाढीचा लाभ झाला आहे.
नवीन योजनेचा मुहूर्त आरोग्यमंत्रीच सांगतील
^राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी विमा कंपनीसोबत केलेला करार संपुष्टात आल्याने नवा करार करण्यात आला आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुनीच योजना सुरू राहणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना कधीपासून सुरू होणार हे आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंतच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया

महेंद्र वारभुवन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
बातम्या आणखी आहेत...