आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : वरुणराजा पावला; राज्यभरात दमदार, प. महाराष्ट्रात संततधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर/ सांगली/ नाशिक/ पुणे - विदर्भ व मध्य महाराष्ट्रादरम्यानच्या सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. शनिवारपासून सुरू झालेली संततधार रविवारी सायंकाळपर्यंत चोवीस तासांनंतरही सुरूच आहे. पावसाचा जोर चांगला असल्याने अनेक धरणांतील जलसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. जूनमध्ये महिनाभर प्रतीक्षा करायला लावलेल्या वरुणराजाने अखेर जुलैच्या प्रारंभी पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात हजेरी लावली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना, वारणा, राधानगरी धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणीसाठा गेल्या चार दिवसांत टीएमसीने वाढला आहे. पुणे जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.

नाशकातही दमदार : गेले महिनाभर नाशिक शहरही काेरडे हाेते. रविवारी पहाटेपासून शहरात दमदार पाऊस झाला. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या पाणलाेट क्षेत्रात पाऊस पडल्याने
गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ हाेऊ लागली अाहे. पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. महिनाभरापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाेणावळ्याचा भुशी डॅमही खळाळून वाहू लागला. त्यामुळे रविवारची सुटी साधून पर्यटकांनी गर्दी केली हाेती.

दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता टिकून अशीच राहिल्यास पुढील तीन ते चार दिवस राज्यात पाऊस टिकून राहील, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. आयएमडीचे संचालक एम. चटोपाध्याय म्हणाले, चांगल्या पावसासाठी कमी दाबाचे क्षेत्र पुरेसे तीव्र असावे लागते. सध्या ओरिसा, पं. बंगाल आणि बंगालच्या उपसागरातील काही भाग येथे कमी दाबाचे तीव्र स्वरुपाचे क्षेत्र सक्रीय झाले असल्याने राज्यात चांगला पाऊस पडत आहे. ही तीव्रता टिकून राहिल्यास येत्या ४८ ते ७२ तासांतही चांगला पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे. सोबत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही किनाऱ्यानजिक कमी दाबाचे पट्टे कार्यरत होण्यास अनुकूल परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे थोडा खंड पडला तरी पुन्हा पाऊस सक्रीय होईल, अशी सुचिन्हे आहेत.

‘सतर्क’चा हाय अलर्ट
‘सतर्क’ संस्थेने संततधार पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा हाय अलर्ट दिला आहे. माळशेज, खंडाळा, ताम्हिणी, कार्ला, माथेरान, अंबानळी, आंबा, फोंडा, मेढा तसेच एक्र्स्प्रेस हायवेवर काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

मराठवाड्यात ढगाळ
मराठवाड्यात रविवारी औरंगाबाद वगळता इतरत्र पाऊस नव्हता. ढगाळ वातावरण असले तरी तुरळक ठिकाणी रिमझिम आहे. औरंगाबाद शहरात दिवसभर रिमझिम होती. आगामी आठवड्यात विभागात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

भंडारदरात आवक
नगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरणांत पाण्याची जोरात आवक सुरू असून मुळा धरणातही सह्याद्रीच्या रांगांमधून नवीन पाणी येणार आहे.
मराठवाड्यातील ३२ तालुके चिंब १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस; २६ तालुक्यांत सरासरी ओलांडली
अौरंगाबाद | औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस आहे. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक तर ३२ तालुक्यांत १५० मिमीपेक्षा जास्त पाऊस आहे. भोकर तालुक्यात सर्वाधिक ३५० मिमी पाऊस पडला. विभागात ३ जूनअखेर १६४ मिमी अपेक्षित पावसाच्या ८८ टक्के पाऊस झाला. तो वार्षिक सरासरीच्या १८ टक्के आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन तालुक्यांत ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस असून यात भोकर ३५०, हदगाव ३१०, हिमायतनगरमध्ये ३३० मिमी पाऊस झाला. ९ तालुक्यांत २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस असून यात कळमनुरी -२८४ मिमी, वसमत-२०९, नांदेड-२७२, अर्धापूर-२६३, लोहा-२११, किनवट-२२६, माहूर-२५९, बिलोली-२१४ तर निलंगा तालुक्यात २०८ मिमी पाऊस झाला.
३२ तालुक्यांत १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस असून यातील २६ तालुक्यांत ३ जूनपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्हा कोरडाच : मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी ८५ िममी पाऊस झाला आहे. ३ जूनपर्यंत जिल्ह्यात १४७ िममी पाऊस अपेक्षित असताना सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस झाला. गंगापूर तालुक्यात मराठवाड्यात सर्वात कमी ३५ मिमी तर खुलताबाद ५७ आणि फुलंब्रीमध्ये ६९ िममी पावसाची नोंद झाली आहे.

लाेणावळ्यात गेल्या ४८ तासांत तब्बल ३८० मिमी पाऊस झाला. पर्यटकांनी भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात मनसाेक्त भिजण्याचा अानंद लुटला.
माथेरान आणि महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर कोसळली दरड
माथेरान येथे जुम्मापट्टीजवळ मुसळधार पावसाने दरड कोसळली. दरम्‍यान, स्थानिक रिक्षा चालकांनी दरड हटवली असून, एका बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. या शिवाय महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर अंबानळी घाटातही दरड कोसळल्‍याचे वृत्‍त आहे.
भिंत कोसळून वाहनांचा चुराडा
मुंबईसह परिसरात पावसाचा जोरदार 'कार'भार सुरू आहे. ठाण्यातील एका भागात पावसामुळे भिंत कोसळून पार्किंगमधील अनेक कारचा असा चुराडा झाला. मुंबईत शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम राहिल्याने वाहतूक मंदावली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. दादर, परळसह दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस झाला. दादर येथील हिंदमाता परिसरात तसेच अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
पालघर येथील म्हासवन पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व पंप बंद करण्यात आले आहेत. परिणामी, वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्‍यामुळे भर पावसात नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
रायगडमध्‍ये पूर
रायगड जिल्ह्यात 24 तासांत 1885.50 मिमी पावसाची नोंद झाली असून, आंबा व कुंडलिका या दोन्‍ही नद्यांनला पूर आला. दरम्‍यान, अष्टमी(रोहा) पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.
येत्या शनिवारपर्यंत सातत्य
येत्या शनिवारपर्यंतराज्यातील अनेक भागात मध्यम आणि हलक्या पावसाचे सातत्य टिकून राहील, अशी शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत ढगांची वाटचाल हवामानाचा अंदाज पाहता कोकणात रोज 40 ते 50 मिलिमीटर, विदर्भात ते 10 मिमी, मराठवाड्यात ते 10 मिमी तर उर्वरित महाराष्ट्रात 10 ते 15 मिमी असा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)