आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत मुसळधार पाऊस, पाहा पावसाची जबरदस्त अशी छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबई व परिसरात सरासरी 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पहिल्याच पावसाने रस्त्यावर जागोजागी पाणी साठले आहे. सबवे वर दोन-दोन फुट तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, मुंबईची लाईफलाईन रेल्वेवर पावसाचा परिणाम झाला आहे. रेल्वे मार्गावर पाणी साठल्याने वाहतुक खोळंबली आहे तर काही ठिकाणी रेल्वे थांबविण्यात आली आहे. पुढील 24 तासात मुंबई व परिसरात जोरदार पाऊस पडेल असे वेधशाळेने म्हटले आहे. दुसरीकडे, मीठी नदीत दोन मुले वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड शहरासह काही ठिकाणी पाणीपुरवठा एकवेळ सुरु झाला आहे. मुंबईत पाण्याची संभाव्य कपात उद्यापासून लागू होण्याची शक्यता असतानाच वरूणराजाने बरसायला सुरुवात केली आहे. मुंबई व परिसरात काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण, रायगड, मावळ-मुळशी पटट्यातही पावसाचे आगमन झाले आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. एकूनच दुष्काळ्याच्या भीतीने चिंतेत असलेल्या शेतक-यांसह सर्वसामान्यांना हायसे वाटत आहे. सरकार तर पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
राज्यात संपूर्ण जून महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. आता पाऊस पडला नाही तर राज्यातील बहुतेक शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा भेडसावणार आहे. राज्य सरकार यामुळे विशेष चिंतेत आहे. विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यावर आलेल्या आहेत अशा स्थितीत दुष्काळ परवडणार नाही अशी राजकीय पक्षांना धास्ती आहे. नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर काही शहरात पाणी कपात सुरु झाली आहे. मुंबईतही गुरुवारपासून 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना पुढील 30 दिवस पाणी पुरेल एवढेच पाणी विविध धरणात असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांनाच दिलासा मिळणार आहे. मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. सांताक्रुझ, चेंबूर, घाटकोपरमध्ये जबरदस्त पावसाने पाणी तुंबलेले दिसत आहे. नवी मुंबई व रायगड पट्ट्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा पाऊस सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. कोकण, सह्याद्रीच्या रांगेतील पट्टा, मुंबई, मावळ-मुळशी भागात पावसाने आगेकुच केली आहे. त्यामुळे पुढील दिवसात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल असे हवामानखात्याने अंदाज व्यक्त केला आहे. एकूनच दुष्काळाची छाया असताना पावसाची दमदार सुरुवात झाल्यास शेतक-यांची व खासकरून सरकारची चिंता मिटणार आहे.
(छायाचित्र: मुंबईतील आज पडलेल्या पावसाची ताजी छायाचित्रे, पुढे आणखी पाहा...)