आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे विस्कळीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई आणि परिसराला शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. शहरात अनेक रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि लोकलसेवा दिवसभर विस्कळीत झाली, त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


गेले दोन दिवस शहरात संततधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाने शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईत दिवसभरात 46 मि. मी. तर पश्चिम उपनगरांमध्ये 95 मि. मी. पावासाची नोंद झाली. ठाणे शहरात 100 मि. मी. पाऊस झाल्याने सकाळीच दिवा, मुंब्रा भागातील लोकलसेवा बंद पडली. त्यामुळे अनेकांना कार्यालयाला दांडीच मारावी लागली.


दुपारी बाराच्या सुमारास मध्य रेल्वेची लोकलसेवा सुरळीत झाली. परंतु रेल्वे ट्रॅकवर पुन्हा पाणी तुंबल्याने दोन वाजता लोकल विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील 33 लोकल फे-या रद्द करण्यात आल्या. विरार आणि नालासोपारा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. परिणामी रेल्वेस्थानकावरही तुरळकच गर्दी दिसून आली.


दोन मुले वाहून गेली
शहरात 25 ठिकाणी पाणी तुंबल्याचे कॉल आल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. सकाळपासून पादचारी व वाहनधारक रस्त्यावरील पाण्यातून वाट काढत जाताना दिसत होते. पवई आणि नालासोपारा येथे दोन लहान मुले नाल्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.


तुळशी धरण भरले
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण शुक्रवारी भरून वाहू लागले. मागच्या वर्षी हे धरण 4 सप्टेंबर रोजी भरले होते. तानसा धरणही काठोकाठ भरल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाने दिली. आणखी दोन दिवस पावसाचा असाच जोर राहण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.