आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 48 तासांत पावसाचा पुन्हा धुमाकूळ, पंढरीत पूरस्थिती; उजनी, वीर धरणातून विसर्ग वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून महाद्वार घाटाच्या पायरीला पाणी लागले आहे. - Divya Marathi
पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून महाद्वार घाटाच्या पायरीला पाणी लागले आहे.
पंढरपूर - उजनी धरणातून ७० हजार, तर वीर धरणातून १४ हजार ९०० क्युसेक वेगाने भीमा नदीत विसर्ग सुरू अाहे. त्यामुळे पात्रात पाणी वाढले असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला अाहे. सध्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून महाद्वार घाटाच्या पायरीला पाणी लागले आहे. दरम्यान, परतीचा पाऊस 15 ते 25 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 
 
तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले की, धरणातून नदीमध्ये असाच विसर्ग सुरू राहिला तर नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता अाहे. त्यामुळे पालिकेकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. उजनी धरणातून आतापर्यंतच्या सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पंढरीतील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह आसपासची दोन, चार मंदिरे निम्मी पाण्याखाली गेलेली असून उर्वरित लहान मंदिरे तसेच विविध संतांच्या समाध्या पाण्याखाली गेल्या आहेत. शहरातील नदीकाठच्या व्यासनारायण, अंबाबाई पटांगण, कैकाडी महाराज मठ परिसर आदी भागांतील नागरिकांना तसेच नदीकाठाच्या दोन्ही बाजूला झोपडपट्टीत राहत असलेल्या मंडळींनादेखील सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून या लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश पालिकेला तसेच पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती बर्गे यांनी दिली. 
 
आपत्ती यंत्रणा विभाग सतर्क-
 
 भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने पंढरपूर नगर परिषदेची आपत्ती यंत्रणा सज्ज झाली आहे. पात्रात एक रेस्क्यू बोट, जेसीबी, डप्पर व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वाहन व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या संपूर्ण पूरपरिस्थितीवर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पालिकेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री, कर विभागाचे प्रमुख सुनील वाळूजकर, अग्निशमन विभागप्रमुख पद्मनाथ कुल्लरवार आदी अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
 
उजनी धरणातून ७० हजार क्यूसेक्सने पाणी सोडले-
 
उजनी पाणलोट क्षेत्रात व निरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरणातून १५ दरवाजातून ७० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. तर निरा नदी पात्रातून ४० हजार क्युसेक्सने पाणी येत आहे. असे एकूण एक लाख १० हजार क्युसेक्स विसर्ग संगम येथे मिसळत आहे. यामुळे भिमा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे गुरूवारी सायंकाळी दहा वाजता १५ दरवाजामधून ४० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. त्यात शुक्रवारी सकाळी पुन्हा वाढ करून ७० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. तर निरा खोऱ्यात ही दमदार पाऊस पडत असल्यामुळे निरा नदी पात्रातून ४० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग संगम येथे भिमा नदीत मिसळत आहे. दोन्ही मिळून एक लाख १० हजारांचा विसर्ग पंढरपूर कडे येत आहे. 
 
उजनी धरणातील विसर्ग व निरा नदीतील विसर्ग असे दोन्ही विसर्गाचा संगम निरा नरसिंहपूर येथे भिमा नदीत होत असल्याने संगम पासून पुढे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भिमा नदी काठच्या गावंसह माढा व पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सावाधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता बंडगार्डन येथून ३ हजार २८० तर दौंड येथून एकूण ३० हजार ३४७ क्युसेक्स विसर्ग उजनीत मिसळत आहे. उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने आणखी पाऊस झाल्यास उजनीतून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या उजनी १०८. ५३ टक्के इतका पाणी साठा झाला आहे.
 
भीमा-नीरेतून पाणी-
 
पुणे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यातील पाच धरणातून केवळ २ हजार ९०३ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. तर निरा खोऱ्यातील धरणातून वीर धरणातून १४ हजार ४११, भाटघर येथून १ हजार ६६७ व गुंजवणे येथून ३०८ असा एकूण १६ हजार ८६ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. मात्र उजनी पाणलोट क्षेत्रात व निरा नदी खोऱ्यातील पात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे निरा व भिमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, बारामती-फलटण रोडवरील पूल गेला वाहून...
बातम्या आणखी आहेत...