आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यभर परतीच्या पावसाचा कहर: मराठवाड्यात विजेचे 10 बळी, दोन दिवसांत 23 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- राज्यात परतीच्या पावसात विजांचे तांडव सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. एकट्या मराठवाड्यात शनिवारी विजा कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. राज्यात इतरत्र दाेन जण ठार झाले. शुक्रवारीही ठिकठिकाणी विजा कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांत राज्यात २३ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला.
 
बीड : झाडाखाली बसलेल्या १० जणांवर वीज कोसळून ५ ठार
धारूर | चारदरी येथील घागरवाडा माळावर शनिवारी झाडाखाली बसलेल्या १० जणांवर वीज कोसळून ४ महिलांसह ५ ठार, ५ जण जखमी झाले. दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. बाजरी काढण्यासाठी गेलेल्या १० जणांनी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली आश्रय घेतला. दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज कोसळून आसाराम रघुनाथ आघाव (२८), उषा आसाराम आघाव (२५), दीपाली मच्छिंद्र घोळवे (२१), शिवशाला विठ्ठल मुंडे (२१) व वैशाली संतोष मुंडे (२५) हे जागीच ठार झाले. सुमन भगवान तिडके (४५), रुक्मिण बाबासाहेब घोळवे (५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सीताबाई दादासाहेब घोळवे (२५), सुरेखा आबासाहेब आघाव (१७) हे पाच जण जखमी झाले.

माजलगाव : लोणगाव येथे शेतात पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या राधाबाई दामोदर कोळसे (५५) या महिलेचा वीज कोसळून अंत झाला. वांगी येथेही वीज पडल्याने शेतात चरत असलेल्या बैलाचा मृत्यू झाला.
 
पैठण : दोन घटनांमध्ये एका महिलेसह २ ठार
ढाकेफळ येथील रामेश्वर दशरथ शेरे (३१) हे येळगंगा नदीवरील ऐन पुलावर मध्यभागी आल्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळली. रहाटगाव येथील यशोदा फासाटे यांचा वीज पडून मृत्यू झाला. एक महिला जखमी झाली.
 
कन्नड : देवळाण्यात एका तरुणाचा मृत्यू
तालुक्यातील देवळाणा येथील संदीप  कचरू  सोनवणे (२१) याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. संदीप त्याचा भाऊ किशोर यांच्या शेतात काम करत होता. दुपारी २ वा. विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
 
बदनापूरात वीज पडून महिला ठार
धोपटेश्वर गावातील शेतात दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वीज पडून चंद्रभागा विष्णू दाभाडे (५२) यांचा मृत्यू झाला. देवगाव शिवारात वीज पडून एक शेळी दगावली.
 
बारामती : मेंढपाळासह ७ मेंढ्या वीज पडून ठार
रानात कळपावर वीज पडून मेंढपाळ श्रीपती नामदेव कोकरे (रा. उंडवडी) व ७ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना   गाडीखेल गावच्या शिवारात शनिवारी घडली. 
 
बुलडाणा :  वीज पडून एकाचा मृत्यू, 3 जखमी 
शेतात सोयाबीन काढण्याचे काम करीत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने गोविंदा पांडुरंग जाधव यांचा मृत्यू, तर  तीन जण गंभीर जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...