मुंबई- मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मुंबई व काेकणात ५ ते १४ आॅक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. अतिवृष्टीमुळे खरीप उत्पादनाचे मोठे नुकसान होऊ शकते. हे लक्षात घेऊन सध्या कापणीयोग्य असलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असेही ते म्हणाले. या काळात वीज कोसळण्याच्या दुर्घटनादेखील घडू शकतात.
ग्रामीण भागातील नागरिक, शेतकऱ्यांनी विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे अावाहनही फुंडकर यांनी केले अाहे.