आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसमातला पहिलाच पाऊस : मुंबईत जोरदार बरसला; मराठवाड्यात शनिवारनंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे - मुंबईची लोकल बंद पाडणारा यंदाच्या मोसमातला पहिलाच पाऊस मुंबईकरांनी बुधवारी अनुभवला. कोकण, गोवा आणि सह्याद्री डोंगररांगांतही जोरदार सरी कोसळल्या. येत्या 24 तासांत मराठवाड्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, 7 जुलैपर्यंत हलक्या सरी कोसळतील आणि नंतर जोरदार पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मोसम विभागाचे मुख्य समन्वयक प्रल्हाद जायभाये यांनी वर्तवला आहे.

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये. मिर्शपीक किंवा आंतरपिके जास्त घ्यावीत, असा सल्लाही जायभाये यांनी दिला. मुंबईसोबतच बुधवारी औरंगाबाद, वैजापूर, लासूर, अहमदनगर परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. औरंगाबाद शहराच्या अध्र्या भागात दुपारी चारच्या सुमारास सरी कोसळल्या.

राज्यात खरिपाच्या सरासरी 134.70 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 8.43 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सुमारे 6 टक्के क्षेत्रावरील पेरण्यांना पाणी न मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट आहे.

केंद्रही सज्ज : ग्रामविकास मंत्रालयाने विशेष देखरेख कक्ष स्थापला असून, याद्वारे संभाव्य दुष्काळाबाबत राज्यांच्या तयारीवर नजर ठेवली जाईल.

जलाशयांतील साठा पिण्यासाठीच : राज्य सरकार
पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातील पाण्याचा साठा प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवणे व टंचाईवरील उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत झाला. संभाव्य टंचाईकडे बघता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना पाणी व वीज बचतीचे आवाहन केले.
- टंचाईवरील सर्व उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
- टंचाईग्रस्त क्षेत्रात टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना
- टँकरची बिले वेळेवर देण्याचे यंत्रणेला आदेश
- उपायांसाठी पैसेवारी विचारात घेतली जाणार नाही
- पिण्याच्या पाण्याचे 1 जुलै 2014 ते 30 जून 2015 पर्यंतचे त्रैमासिक कृती आराखडे तयार करण्यात येणार
(फोटो - बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, घाणेगाव परिसरात दुपारी अर्धा तास पाऊस झाला. छाया : धनंजय दारुंटे)