आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वदूर पाऊस, दादरमध्ये झाड पडून 1 ठार, 2 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी पहाटेपासून मुंबईत पाऊस पडायला लागल्यानंतर मंगळवारी सकाळपासून दादर परिसरात पाणी साचू लागले होते. - Divya Marathi
सोमवारी पहाटेपासून मुंबईत पाऊस पडायला लागल्यानंतर मंगळवारी सकाळपासून दादर परिसरात पाणी साचू लागले होते.
मुंबई- मुंबईत सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडू लागला आहे. जोरदार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबापुरी होऊ लागली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मुंबईची लाईफलाईन लोकलसेवेवर परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईतील मध्य, हॉर्बर व पश्चिम या तीनही रेल्वेमार्गावर गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीरा व धीम्या गतीने धावत आहेत. मुंबईत हायटाईडचाही धोका वर्तविण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर पावसाने मुंबईत विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र, मध्यरात्री तीननंतर पुन्हा एकदा जोराचा पाऊस पडत आहे. दादर, सायन, माहिम, हिंदमाता, मांटुगा परिसरात पाणी साचू लागले आहे.
दादरमध्ये आगर बझार येथे झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एका महिलेसह दोन जण जखमी झाली आहे. आगर बाजार येथे वडाच्या झाडाखाली खाद्यपदार्थाच्या गाडीवर हे झाड कोसळले. यामध्ये आरे कुलम (वय 25) याचा मृत्यू झाला. तर, गीता खरवा (वय 30) यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. केईएममध्ये उपचारादरम्यान आज सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला.
गेल्या गुरुवारी-शुक्रवारी मुंबईला पावसाने झोडपले होते. त्यामुळे दोन दिवस शाळा, महाविद्यालये, कोर्ट, दुकाने, हॉटेल बंद पडली होती. दोन दिवस लोकलसेवाही ठप्प झाली होती. दरम्यान, पावसाचा जोर लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, साचलेले पाणी उपसण्यासाठी पाचशेच्या घरात पंप उपलब्ध करून ठेवले आहेत.
राज्यभर सर्वदूर पाऊस- मान्सूनने महाराष्टाला व्यापले असून, कोकण किनारपटटीसह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूरात अतिवृष्टी झाली आहे. पुण्यात मागील दोन-तीन दिवसापासून संततधार सुरु आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळेच मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याचे मंगळवारचे चित्र आहे.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, मुंबईची कशी तुंबापुरी होऊ लागली आहे ती...
बातम्या आणखी आहेत...