आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमंत करकरे स्मृतिस्तंभावर बिल्डरने टाकला हातोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्लय़ात शहीद झालेले ‘एटीएस’चे प्रमुख हेमंत करकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालाड येथे उभा केलेला स्तंभ गुरुवारी बिल्डराने भुईसपाट केला. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या स्मृतिस्तंभाची उभारणी 2009 मध्ये झाली होती.

मालाड पूर्व येथील तांबे मैदानाजवळ शहीद हेमंत करकरे चौक आहे. येथे राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक अजित रावराणे यांनी स्मृतिस्तंभाची उभारणी केली होती. विशेष म्हणजे याचे उद्घाटन करकरे यांच्या पत्नी कविता यांनी केले होते.

स्मृतिस्तंभाजवळ लतीश गड्डा या बांधकाम व्यावसायिकाची जागा आहे. तेथे तो इमारत उभारत आहेत. गुरुवारी दुपारी गड्डा यांनी हेमंत करकरे स्मृतिस्तंभ भुईसपाट केला. शुक्रवारी पालिका सभागृहात सेनेचे नगरसेवक सुनील गुजर यांनी सदर प्रश्न उपस्थित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. महापौरांनी याची चौकशी करून सभागृहास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पी उत्तर वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी चौकशीस सुरुवात केली आहे.

26/11 हल्लय़ामधील शहीद तुकाराम ओंबळे यांचा पुतळा शिवसेनेने गिरगाव चौपाटीवर उभारून बाजी मारली होती, परंतु पालिकेत सेनेची सत्ता असूनही करकरे यांचा स्मृतिस्तंभ सुरक्षित ठेवू न शकल्याने पालिकेत युतीवर मोठा बाका प्रसंग ओढवला आहे.

जमिनीची खातरजमा
स्मृतिस्तंभ उभारण्यात आलेली जमीन पालिकेची आहे की बिल्डरची याबाबत पालिका अधिकारी चौकशी करत असून त्यानंतरच बिल्डरवर गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.