आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानधील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत अतिदक्षतेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका कॅफेतील ओलीस नाट्य आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानातील पेशावर येथे मंगळवारी सैनिकी शाळेवर झालेल्या तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याचबरोबर ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून शहरातील महत्त्वाच्या इमारती, शैक्षणिक संस्था आणि महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. पेशावर येथील घटनेनंतर शहरातील सर्व ठाण्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

ही माहिती पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ, शहरातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि महत्त्वाच्या इतर इमारतींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यासोबतच ठिकठिकाणी नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा सूचनाही पोलिसांच्या वतीने देण्यात येत आहेत.

रेल्वेस्थानकांवरही अलर्ट
पेशावर येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली असून कसून तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये बहुतांश वेळा रेल्वेला टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहावे, अशा उद्घोषणाही रेल्वेमार्फत करण्यात येत आहेत. वर्षाअखेरचे सेलिब्रेशन लक्षात घेता हॉटेल्स आणि निवासी ठिकाणांवरही पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. सागरी गस्त वाढवली
मुंबईच्या चहुबाजूंनी समुद्र असल्याने मुंबईच्या सागरी किना-यांवर तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांनी आपल्या गस्तीत वाढ केल्याची माहिती पोलिस खात्यामार्फत देण्यात आली आहे.