आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिन, दहीहंडीसाठी मुंबई शहरात ‘हाय अलर्ट’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यंदा स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे. स्वातंत्र्यदिनाची सुटी असल्याने मुंबईतील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांसह मुंबईबाहेरील लोकांचीही गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. या गर्दीचा फायदा घेत दहशतवादी घातपात घडवू शकतात, ही बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी शहर आणि उपनगरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.  
 
गोविंदांचे वय आणि मानवी मनोऱ्यांच्या उंचीबाबतचे निकष मुंबई उच्च न्यायालयाने शिथिल केल्यानंतर यंदा गोविंदा पथके आणि आयाेजकांमध्ये उत्साह आहे. त्यातच स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी एकाच दिवशी आल्याने मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. स्वातंत्र्यदिनी घातपाताची शक्यता लक्षात घेता मुंबईतील सातशेच्या आसपास संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहर आणि उपनगरातील महत्त्वाच्या इमारती, कार्यालये, रेल्वेस्थानके, उत्सवाची ठिकाणे तसेच मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

खुद्द मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर हेसुद्धा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार  असल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...