आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Alert In State, Security Increases In Mumbai

राज्यभरात हाय अलर्ट, अतिरेकी हल्ल्याच्या भीतीने मुंबईत बंदोबस्त वाढवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंजाबमधील हल्ल्याने संपूर्ण देशभरातील सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून मुंबईसह राज्यभरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याकूब मेमनच्या नियोजित फाशीमुळेही राज्यात विशेषत: मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

मुंबईसह पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांतही पुढील काही दिवस सुरक्षेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिस विभागाला देण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी माध्यमांना दिली. पुढील काही दिवस राज्यातील या प्रमुख शहरातील शॉपिंग मॉल, रेल्वेस्थानके, सिनेमागृहे, देवस्थाने अशा गर्दीच्या ठिकाणी अतिरेकी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे ते म्हणाले. मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरुदासपूरचा अतिरेकी हल्ला असेल किंवा याकूब मेमनची नियोजित फाशी या घटनांमुळे मुंबई पोलिसांची विशेष सुरक्षा पथके तसेच सर्व पोलिस ठाण्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

शहरातील सिद्धिविनायक मंदिर, अमेरिकन कॉन्सुलेट यासारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील गोदामांसारख्या निर्जन ठिकाणीही गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिस खब-यांच्या जाळ्यांमधूनही माहिती मिळवण्याच्या सूचना देतानाच विविध कारागृहांत असलेल्या दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हेगारांकडूनही माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच संशयास्पद वाहन, व्यक्ती किंवा वस्तूंच्या तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती एटीएस प्रमुख विवेक फणसाळकर यांनी दिली.

पुढे वाचा... नागपुरात संघ मुख्यालय, जेलची सुरक्षा वाढवली
नागपुरात संघ मुख्यालय, जेलची सुरक्षा वाढवली
प्रतिनिधी | नागपूर
पंजाबमधील हल्ला व मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमनला गुरुवारी नागपुरात फाशी दिली जाण्याची शक्यता असल्याने नागपूर शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, मध्यवर्ती कारागृह तसेच दीक्षाभूमीसह संवेदनशील स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहरात सर्वत्र वाहनांची तपासणी सुरू होती.
शहराच्या काही भागांत क्विक रिस्पॉन्स पथक तैनात करण्यात आले, तर नियंत्रण कक्षातही एक पथक राखीव ठेवण्यात आले. शहरातील सर्वात संवेदनशील स्थळ असलेले संघ मुख्यालय, रेशीमबाग परिसरातील हेडगेवार भवन, दीक्षाभूमी, रेल्वेस्थानक, बसस्थानक, टेकडी गणेश मंदिर यासह जवळपास डझनावर ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ केली. या प्रत्येक ठिकाणी श्वान पथक मागवून परिसर पिंजून काढला.
वरिष्ठ अधिकारीही या स्थळांना भेटी देऊन व्यवस्थेची खात्री करून घेत होते. शहरात येणारे महामार्ग, राज्यमार्गांवर कठडे उभारून वाहनांच्या तपासणी दिवसभर सुरु होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. प्रमुख रस्त्यांवर कठडे लावून वाहनचालकांची तपासणी सुरु होती.

नाशिक कुंभमेळ्यात ‘फाेर्स वन’ तैनात
नाशिक | पंजाबमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडोच्या धर्तीवर स्थापलेले फोर्स वन कमांडो पथक तैनात करण्याचे निर्देश राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी दिले अाहेत. कुंभमेळ्याच्या सुरक्षा नियोजनाची पाहणी करून या पथकाने सुरक्षेचा आढावा घेतला. शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्वत्र नाकेबंदी आणि सीमेवर तपासणी करण्याची आदेशही पोलिसांना दिले. कुंभमेळा क्षेत्रात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दहशतवादविराेधी पथक, बीडीबीएस पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे दयाल यांनी सांगितले.