आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजावर अखेर बंदी, काेर्टाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने काढले परिपत्रक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जीवघेण्या नायलाॅन व चिनी मांजाच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घालण्याचा अादेश राज्य सरकारने अखेर गुरुवारी काढले. या मांजामुळे गेल्या काही दिवसांत असंख्य पक्षी व काही माणसांचे बळी गेले अाहेत.

गेल्या दाेन- तीन वर्षांपासून राज्यभर या नायलाॅन मांजाविराेधात माेहीम उघडण्यात अाली अाहे. ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने यात पुढाकार घेतला अाहे. नागपूरमधील ‘पीपल फाॅर अॅनिमल’ या संघटनेने तर या मांजावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिकाही दाखल केली हाेती. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी ‘संक्रांतीच्या वेळी या मांजावर बंदी घालण्यात अाली अाहे,’ असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात अाला हाेता. मात्र, या मांजावर बंदीबाबत कायमचे धाेरण ठरवा, असे निर्देश न्यायालयाने दिले हाेते. त्यानुसार राज्य सरकारने पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार गुरुवारी ही अधिसूचना जारी केली अाहे.

दरम्यान, नागपूरच्या पाेलिस अायुक्तांनीही उपराजधानीत या मांजाला बंदी घालण्याचे अादेश काढले हाेते. मात्र, पतंग विक्रेत्यांच्या रिद्धी सिद्धी या संघटनेने या अादेशाला नागपूर खंडपीठात अाव्हान दिले हाेते. या सुनावणीतही न्यायालयाने बंदी उठवण्यास नकार दिला हाेता. तसेच सरकारला याबाबत लवकरात लवकर धाेरण ठरविण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार प्लास्टिक किंवा सिंथेटिक साहित्यापासून तयार करण्यात येणा-या मांजाचे उत्पादन, विक्री व वापरास राज्यात बंदी घालण्यात अाली अाहे. मनुष्यप्राणी व अाकाशात उडणा-या पक्ष्यांच्या जीवितास हा मांजा हानीकारक ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात अाला अाहे. मांजाची ठाेक विक्री करणा-यांनाही या बंदीबाबत पूर्वकल्पना देणार असल्याचे अादेशात म्हटले अाहे.

केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा
न्यायालयीन पातळीवर लढा देतानाच ‘पेटा’ संघटनेने केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला आवाहन करून मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल विभागाला पत्र पाठवून याबाबत पावले उचलण्याची मागणीही करण्यात अाली हाेती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.

‘दिव्य मराठी’तूनही जनजागरण
दुष्परिणाम लक्षात घेता, दैनिक ‘दिव्य मराठी’ने नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या विराेधात ‘मांजा जीवघेणा, दुर्घटनेचा फणा’ या वृत्तमालिकेतून जनजागृती अभियान राबवले हाेते. या माध्यमातून नायलाॅन मांजाचे दुष्परिणाम विशद करण्याबराेबरच शहरातून हा मांजा हद्दपार करण्यासाठी माेहीमही राबवण्यात अाली. त्याला महापालिका आणि पोलिस प्रशासनाने सहकार्य केले हाेते. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर या यंत्रणांनी जुने नाशिक, नाशिक रोड आणि सातपूर परिसरात नायलॉन मांजा विक्री करणा-या दुकानांवर छापे टाकून माेठ्या प्रमाणावर मांजा जप्त केला हाेता. राज्य सरकारच्या गुरुवारच्या बंदी अादेशामुळे दैनिक दिव्य मराठीने राबवलेल्या माेहिमेलाही राज्यभर बंदीने यश अाले अाहे.