आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Orders To Give Facilities In Train For Womens

महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेतील व्यवस्था सुधारा, उच्च न्यायालयाचे रेल्वे खात्याला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेल्वे प्रवासी महिलांशी संबंधित गुन्ह्यांची गंभीर दखल घेत प्रवासी महिलांच्या सुरक्षेकरिता आपल्या व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रेल्वे व्यवस्थापनाला दिले. तसेच या नव्या तंत्रज्ञानाचा वापर महिलांच्या सुरक्षेसाठी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एखादी समिती नेमण्याच्या पर्यायावरही विचार करा असेही न्यायालयाने म्हटले आहे.

रेल्वेच्या फलाटांवर सीसीटीव्ही लावल्याने गुन्हे रोखता येतील असे गृहित धरणे योग्य नसून हे तंत्रज्ञान आता जुने झाले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आता आपण करायला हवा, अशा सूचनाही न्यायालयाने रेल्वे व्यवस्थापनाला केली आहे. न्या. एन.एच.पटेल आणि एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर महिलांशी संबंधित गुन्ह्यांची वाढती संख्या आणि त्यावरील उपाय योजण्यात सरकारला आलेले अपयश अशा आशयांच्या विविध याचिकांवर बुधवारी एकत्रितपणे सुनावणी पार पडली.
छुप्या कॅमेऱ्यांवर कारवाईचा विचार
मुंबईसारख्या महानगरात जिथे सुरक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भासते अशा ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्हायला हवा असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने या वेळी नोंदवले. माॅल आणि शोरूम्सच्या चेंजिंग रूम्समध्ये छुपे कॅमेरे आढळल्यास अशा दुकानांचे परवाने रद्द करण्यासंदर्भातील सुधारणा संबंधित कायद्यात करावी असे निर्देश गेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.