आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र सदन घोटाळा: पंकज भुजबळांवर अाता अटकेची टांगती तलवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडी विशेष न्यायालयाने बजावलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची अामदार पंकज भुजबळ यांनी केलेली विनंती फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष ईडी न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या २९ जुलै रोजी पंकज भुजबळ यांच्यासह इतर सहआरोपींना विशेष ईडी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे त्या वेळी विशेष ईडी न्यायालयानेही पंकज यांचा जामीन अर्ज नाकारल्यास त्यांना अटक होऊ शकते.
तब्बल ८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले अाहे. त्यानंतर विशेष ईडी न्यायालयाने अटकेत असलेले आरोपी वगळता इतर ४३ आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे. हे वॉरंट बजावलेल्या सर्व आरोपींना २९ जुलै रोजी विशेष ईडी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक आहे.
या अजामीनपात्र वॉरंटला पंकज भुजबळ यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश पंकज यांना दिले होते. त्यानुसार पंकज यांनी उच्च न्यायालयात या अजामीनपात्र वॉरंटविरोधात धाव घेतली होती. या प्रकरणी न्या. अभय अोक आणि न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. या वेळी उच्च न्यायालयाने पंकज यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत विशेष ईडी न्यायालयानेच निर्णय घ्यावा, असा निर्णय दिला. मात्र, तो निर्णय भुजबळ यांच्याविरोधात गेल्यास किमान दोन दिवस त्यांना अटक न करता उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ द्यावा, असे सुचवत उच्च न्यायालयाने या सूचनेवर ईडीची काय भूमिका असेल, अशी विचारणा केली होती.
तत्काळ अटक हाेण्याची शक्यता
बुधवारच्या सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू स्पष्ट केली. विशेष न्यायालयाने जर पंकज भुजबळांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला, तर ईडीच्या वतीने त्यांना तत्काळ अटक केली जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यास नकार देत भुजबळांचा अर्ज फेटाळला.
बातम्या आणखी आहेत...