आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Slams ACB About Speed Of Inquiry In Sunil Tatkare Case

तटकरेंच्या चाैकशीबाबत तीन वर्ष काय केले?, संथ तपासाबाबत हायकाेर्ट नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सक्तवसुली संचालनालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीच्या संथ गतीबद्दल उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. जनहित याचिका दाखल होऊन तीन वर्षे होऊही तपास यंत्रणा कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ न शकल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी २०१२ मध्ये याबाबत याचिका केली होती. त्यावर आरोपांची चौकशी करून अहवाल एसीबी आणि ईडीने सादर करावा असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र तीन वर्षांनंतरही चौकशीत प्रगती नसल्याबाबत बुधवारी न्यायालयाने तपास यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी केली.

अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ‘ईडी’ची तर सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ‘एसीबी’ची बाजू मांडताना सांगितले की, चौकशी सुरू होऊन सहाच महिने झाले असून तपास यंत्रणांना आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. यावर ‘ही याचिका सुनावणीयोग्य नसून ती रद्द करावी’, असे सांगत याचिकाकर्त्यांकडे पोलिस तक्रार दाखल करणे किंवा महानगर दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पर्याय असल्याचा मुद्दा तटकरेंच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅस्पी चिनॉय यांनी मांडला. त्यावर याचिकाकर्त्यांनी या पर्यायांवर विचार करावा, असे सांगत न्यायालयाने २ आठवड्यांपर्यंत सुनावणी तहकूब केली.

तटकरे दाेषी अाहेत की नाही
ही चौकशी पूर्ण करण्यास अजून आपल्याला किती कालावधी लागेल, गेल्या तीन वर्षांत आपण काय केले, एवढ्या कालावधीत आपण किमान एखाद्या निष्कर्षाप्रत आला आहात का, उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे तटकरे या प्रकरणी सकृतदर्शनी दोषी आहेत किंवा नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने या वेळी केली. शिवाय अशा पद्धतीने चौकशी केली तर ही चौकशी कधीच संपणार नसल्याचा टोलाही न्यायालयाने लगावला.

काय आहे प्रकरण?
सुनील तटकरे यांनी स्वत:च्या आणि नातेवाइकांच्या नावे तब्बल ५१ बोगस कंपन्या स्थापन करून बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या कंपन्यांद्वारे पैशाची अफरातफरही केल्याचा अाराेप केला हाेता. मात्र तटकरे यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे हे आरोप फेटाळले होते.