आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमायत बेग (फाईल फोटो) - Divya Marathi
हिमायत बेग (फाईल फोटो)
मुंबई- पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी मिर्झा हिमायत इनायत बेगला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 साली पुण्यातील सेशन कोर्टाने हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर बेग याने हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर आज हिमायत बेगला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा देत फाशीची शिक्षा रद्द करीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हिमायत बेग सध्या नागपूर येथील जेलमध्ये आहे.
पुण्यातील उच्चभ्रू व परदेशींचे वास्तव्य असलेल्या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 जानेवारी 2010 रोजी इंडियन मुजाहिदीनने बॉम्बस्फोट घडवला होता. त्यात 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. तर 64 जण जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता. या बॉम्बस्फोटप्रकरणी दहशवादविराधी पथकाने (एटीएस) इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असलेल्या हिमायत बेगला 7 सप्टेंबर 2010 ला बीडमधील उदगीर येथून अटक केली होती. त्यावेळी त्याच्या घरातून 1200 किलो शस्त्रसाठा जप्त केला होता.
विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी कोर्टात सांगितले होते की, या प्रकरणात एटीएसने एकून 40 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. हिमायत बेग हा त्यातील मुख्य आरोपी आहे. 2008 साली कोलंबो येथे झालेल्या मिटिंगमध्ये पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट घडविण्याचा कट रचला गेला. तेथेत त्याने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे उदगीर येथील त्याच्या सायबर कॅफेत त्याने हा बॉम्ब बनविला. ज्या दिवशी हा स्फोट झाला त्या दिवशी बेग औरंगाबादमधील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता.
या स्फोटप्रकरणी मोहसीन चौधरी, यासिन भटकल, रियाज भटकल, इक्बाल भटकल आणि फैयाज काझगी यांच्यावरही कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अटक झालेला एकमेव आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग (31, रा. उदगीर, जि. लातूर) हा दोषी आढळला होता.
बेगविरुद्ध 2607 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्याला 302 (खुन करणे), 307 (खुनाचा प्रयत्न), 153 (देशाविरुध्द युध्द पुकारणे), 435 (मालमत्ता नुकसान), 120 ब (गुन्ह्याचा कट रचणे), 474 (बनावट कागदपत्रांचा वापर), बेकायदा हालचाल प्रतिबंधक कायदा सेक्शन 10, 13, 16, 18 व 20 नुसार दोषी ठरवले होते. तसेच भादंवि कलम 302, 120 ब, 10 (अ) व (ब), बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायदा 16 (1) अ व सेक्शन 13 नुसार त्यास दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता हायकोर्टाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...