आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन लढाईसाठी ऐेतिहासिक पुराव्यांचा आधार; शिवराय, शाहू महाराजांचे संदर्भ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा नव्या पुराव्यानिशी लढण्याची तयारी राज्य सरकारने चालवली आहे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या कसा मागास होता याचे तब्बल ७२ ऐतिहासिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. राज्यातील काही इतिहास संशोधक, प्रथितयश लेखक, मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि राज्याच्या पुराभिलेखागाराचे काही अधिकारी असा फौजफाटाच हे पुरावे गोळा करण्याच्या कामी लागलेला आहे. १७८० ते १९५२ अशा सुमारे पावणेदोनशे वर्षांच्या कालखंडातील मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध करणारे हे ऐतिहासिक पुरावे असल्याचा दावा संशाेधकांनी केला आहे.

मराठा अारक्षणप्रश्नी सात डिसेंबरला सुनावणी अाहे. त्या वेळी जोरकसपणे बाजू मांडण्यासाठी या समाजाच्या मागासलेपणाचे पुरावे गोळा करण्याचे काम सरकार पातळीवर वेगाने सुरू आहे. त्यासाठी पुराभिलेखागाराचा धांडोळा घेतला जात आहे. आतापर्यंत ७२ ऐतिहासिक पुरावे हाती लागले असून न्यायालय या पुराव्याची गंभीर नोंद घेईल, असा विश्वास पुरावे गोळा करणाऱ्यांपैकी एका तज्ज्ञाने व्यक्त केला. पुराव्यांबद्दल विचारले असता हे तज्ज्ञ म्हणाले की, ‘मराठा ही जात आणि कुणबी या पोटजातीचा एकत्र उल्लेख असलेला १८५० सालातील एक जन्माचा दाखला आमच्या हाती लागला आहे. हा जोरकस पुरावा असून याद्वारे कुणबी आणि मराठा एकच आहे, हे सिद्ध करणे शक्य आहे. याशिवाय ब्रिटिश काळातील शिक्षण विभागाची परिपत्रके, जुने पत्रव्यवहार आणि १९११ आणि १९३१ सालच्या जनगणनांच्या प्रतीही शाेधून काढल्या आहेत. या जनगणनांमध्ये जातवार नोंदी आहेत. तसेच पेशवेकालीन मोडी लिपीतील खानेसुमारीची म्हणजेच जनगणनेची प्रतही मिळाली आहे. तसेच १९०८ सालच्या मोर्लेमेंटो कमिशन आणि १९१९ सालच्या माँटेग्यू चेम्सफर्ड कमिशन अहवालातील जातीसंबंधी नोंदींचाही वापर पुराव्यादाखल करण्यात येणार आहे. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साऊथ ब्युरो कमिशनसमोर दिलेल्या साक्षीतील प्रशासकीय नोकऱ्यांबाबत त्यांची विधानेही पुराव्यादाखल दिली जातील. हे पुरावे आरक्षणाच्या समर्थनार्थ पुरेसे असले, तरीही आणखीही काही पुरावे गोळा करण्याचा आमचा प्रयत्न अाहे.’

साहित्याचाही अाधार : सामाजिकस्थितीचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्यात उमटत असते, ही बाब लक्षात घेऊन मराठी साहित्यात मराठा समाजाच्या मागासलेपणावर प्रकाश टाकणारा कथा-कादंबऱ्यांमधील मजकूरही शोधला जात आहे. श्री.रा. टिकेकर यांच्या कादंबरीत १८९८, १८९९ आणि १९०० सालातील सलग तीन वर्षे मराठी मुलखात पडलेल्या दुष्काळाचे दाहक वर्णन केले आहे. या कादंबरीचा नायक हा मराठा समाजातील असून त्याचे लेखकाने चितारलेले अायुष्य हे मराठ्यांच्या मागासलेपणाचा पुरावा म्हणून उपयोगी पडू शकेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. याशिवाय सि.र. तारकुंडे यांच्या “ब्राह्मणेतर चळवळीची पूर्वपीठिका’ या ग्रंथातील काही मजकूरही पुराव्यादाखल जोडण्याचा विचार सुरू आहे.

लढा मराठा आरक्षणाचा - भाग एक
शूद्र असल्याचे कारण देत तत्कालीन ब्राह्मण समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता, तर वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांचेही क्षत्रियपण नाकारण्यात आले होते. इतिहासातील हे प्रसंगदेखील पुराव्यादाखल न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत. त्याचाही कायदेशीर लढ्यात नव्याने वापर करण्याचा प्रयत्न आहे.
बातम्या आणखी आहेत...