आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार निलंबनाची ‘परंपरा’ कायमच; सेनेचे रावते तर मनसेचे दरेकर निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्याऐवजी मुख्यमंत्री आणि विधान परिषद सभापतींनाच अपशब्द वापरल्याने मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांचे विधानसभेतून आणि शिवसेना आमदार दिवाकर रावते यांचे विधान परिषदेतून शुक्रवारी निलंबन करण्यात आले.

दरेकरांच्या निलंबनावर विरोधकांत एकी दिसली नाही. सभागृहात बोलण्यासही वरिष्ठ नेते तयार नव्हते. सेनेच्या आमदारांनी थोडीफार मनसेला साथ दिली. मात्र, मनसेमधील एक गट या कारवाईमुळे खुश झाल्याची चर्चा आहे. दरेकर यांनी मात्र आपण अपशब्द काढला नसल्याचा दावा केला आहे.

नेमके प्रकरण काय?
विधानसभेत मुंबईच्या प्रश्नांवरील चर्चेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले. ते असमाधानकारक असल्याने सांगत विरोधकांनी सभात्याग केला. सभागृहाच्या बाहेर जाताना दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून अपशब्द वापरला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही तो ऐकला व तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी सदस्य बाबा सिद्दिकी, वीरेंद्र जगताप, अमीन पटेल, जितेंद्र आव्हाड आदींनी आक्रमक होत दरेकर यांच्या निलंबनाची मागणी केली. दरेकर यांचे शब्द सभागृहाच्या परंपरेला साजेसे नसल्याचे सांगत पुरके यांनीही कानउघाडणी केली. तहकुबीनंतर कामकाज सुरू झाल्यानंतर अशासकीय विधेयके मांडण्यात येत असतानाच पुरके यांनी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांना निवेदन करण्यास सांगितले. त्या वेळी पाटील यांनी दरेकर यांना 2014 च्या पावसाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला व तो संमत करण्यात आला. दरेकर यांना या काळात मुंबई व नागपूर विधिमंडळ आवारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरेकर यांना आपली बाजू मांडू द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु निलंबनावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पुरके यांनी दरेकर यांना सभागृहाबाहेर जाण्यास सुनावले. तरीही गोंधळ न थांबल्याने त्यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


दिवाकर रावते यांचे निलंबन विरोधकांच्या अनुपस्थितीत

विधान परिषदेमध्ये सिंचनाच्या चर्चेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाल्याने सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या दालनात एक बैठक घेतली. या वेळी रावते यांनी सभापतींना अपशब्द वापरल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी रावतेंच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला व तो संमत करण्यात आला. त्या वेळी सभागृहात विरोधक गैरहजर होते. त्यांनी सिंचनाच्याच मुद्द्यावर सभात्याग केला होता. उपसभापती वसंत डावखरे यांच्या उपस्थितीत हे निलंबन मान्य करण्यात आले.

रावते यांचा माफीनामा
‘सभापती म्हणून आपला आदर आहे. विधिमंडळ सदस्यांचे आपण सुरक्षा कवच आहात. न्यायदाते आहात. न केलेल्या चुकांची शिक्षा का, हे मला कळत नाही. परंतु आपल्यासारख्या ज्येष्ठाचा व सभापती या नात्याने आपली माफी मागण्यास मला कमीपणा वाटत नाही,’ असे रावते यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

असे घडलेच नाही

आमदाराने शिवीगाळ केल्याचा कांगावा सत्ताधारी करत असून प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. सरकारने विरोधकांची मुस्कटदाबी चालवली असून सिंचनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येईल या भीतीने ही कारवाई केली आहे. या पक्षपाती धोरणाचा निषेध करत असून विधानसभेमध्ये अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार आहोत.’’
एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते विधानसभा

- अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘एपीआय’ सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी राम कदम, क्षितिज ठाकूर, प्रदीप जैस्वाल, जयकुमार रावल आणि राजन साळवी यांना निलंबित केले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

- 2009 मध्ये ‘सपा’चे आमदार अबू आझमी यांना मनसेच्या आमदारांनी मारले होते. त्यामुळे राम कदम, रमेश वांजळे, शिशिर शिंदे आणि हर्षवर्धन जाधव यांचे निलंबन झाले होते.