आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Ran Case : Leaders, Actors Met Convicted Salman Khan

आरोपी सलमानचा नेते, अभिनेत्यांना पुळका - सक्तमजुरीची शिक्षा झाल्यानंतर भेटणाऱ्यांची गर्दी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाॅलीवूड अभिनेत्री मलाईका अरोरा व अभिनेता अमिर खानने गुरुवारी सलमानच्या मुंबईतील घरी जाऊन त्याची भेट घेतली. परतताना अामिरला दारापर्यंत साेडण्यास अालेला सलमान.
मुंबई - सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या अभिनेता सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या मुंबईतील घरी गुरुवारी मान्यवरांची रीघ लागली होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांचाही समावेश असल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी न्यायव्यवस्थेने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला जाहीरपणे भेटणे नैतिक आहे का, असा सवाल विचारला जात आहे. गुरुवारी सिनेअभिनेता आमिर खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, मलाईका अरोरा यांनीही सलमानची भेट घेतली.

२००२ मध्ये मद्यधुंद अवस्थेत आपल्या गाडीखाली एका व्यक्तीला चिरडून ठार केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमान खानला बुधवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. तीनच तासांत त्याला जामीन मिळाल्यामुळे अगोदरच नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सलमानच्या वांद्रे येथील घरी जाऊन भेट घेतली. राज यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आमदार नितेश राणेही सलमानला भेटले. सलमान आपला कौटुंबिक मित्र असल्याने आपण त्याची भेट घेतल्याची सारवासारव राणेंनी केली, तर ठाकरेंनी मात्र या भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

नेते म्हणवण्यास लायक नाहीत
"आपण सार्वजनिक जीवनात आहोत. लोकांचे आपण प्रतिनिधित्व करतो याचे भान या दोन्ही नेत्यांनी ठेवायला हवे होते. मात्र, त्यांचे बालीश वागणे पाहिले, तर हे लोक नेते म्हणवून घेण्यास लायक नाहीत.'
कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते

ही संकेतांची पायमल्ली
कोणी कोणास भेटावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने भेटणे नेत्यांनी टाळावे, हा राजकीय संकेत आहे. मात्र, राज यांची भेट राजकीय संकेताला धरून नाही.
आशिष शेलार, भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार

मी जे शब्द वापरले, त्याबद्दल माफी मागताे : अिभजित
अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य करणारा गायक अभिजित भट्टाचार्य याने आपल्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या टीकेनंतर गुरुवारी रात्री िट्वट करून अभ्रद िवधानाबद्दल माफी मागितली. "मी जे शब्द वापरले, त्याबद्दल मी माफी मागतो. मला कोणाच्याही भावनांना दुखवायचे नव्हते,' असे ट्विवट त्याने केले.

अभिजितविरोधात कोर्टात तक्रार, रिपाइंचाही इशारा
‘रस्त्यावर झाेपणारे कुत्र्याच्या माैतीने मरणारच’ असे सांगत सलमानच्या अपराधाचे समर्थन करणाऱ्या गायक अभिजीतविराेधात देशभर संतापाची लाट उसळली अाहे. मुजफ्फरनगरच्या स्थानिक न्यायालयात वकील सुधीर कुमार आेझा यांनी त्याच्याविराेधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे, तर गायक अभिजित भट्टाचार्य याचे मुंबईत होणारे रेकाॅर्डिंग्ज आणि स्टेज शो उधळून लावण्याची धमकी रिपाइंचे उपाध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली आहे. अभिजितच्या वक्तव्यामुळे अनेकांची मने दुखावली आहेत. त्याचे वक्तव्य गरिबांची थट्टा करणारे होते. जोपर्यंत तो माफी मागणार नाही, तोपर्यंत आम्ही त्याचे रेकॉर्डिंग आणि शो होऊ देणार नाही, असा इशारा पंडित यांनी दिला.

...तर मी अभिजितला नपुंसक
केलं असतं : ऋषी कपूर

गायक अभिजित भट्टाचार्यने ट्विटरवर केलेल्या वादग्रस्त विधानावर अभिनेता ऋषी कपूर यांनी खरमरीत टीका केली आहे, "मी जर हुकूमशहा असतो, तर गायक अभिजितला नपुंसक बनवले असते,' असे टि्वट कपूरने केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अभिजितविषयी तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या कपूर यांनी सलमान खानविषयी मात्र सहानुभूती व्यक्त केली आहे.

अाज सलमान अनुपस्थित राहणार
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविराेधात व जामिनासाठी सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली अाहे. त्याची शुक्रवारी सुनावणी हाेणार अाहे, मात्र त्या वेळी सलमान न्यायालयात हजर राहणार नसल्याची माहिती अाहे.