आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला बेल: देशभर 2.78 लाख कच्चे कैदी तुरुंगात, न्यायदानाबाबत प्रश्नचिन्ह!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. त्याचे अपीलही दाखल करून घेतले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सलमान खानने सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली आणि पाचच मिनिटांत जामीन मिळवून सुटकाही करून घेतली. येत्या 15 जून रोजी सलमान खानच्या अपिलावर उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार असून जुलैअखेरीस ही सुनावणी संपवण्याचा न्यायालयाचा मानस आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानने त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळवला होता. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास सलमानच्या अपील आणि जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी सलमानचे अपील दाखल करून घेत सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. तसेच जामिनासाठी अगोदर सलमान खानने सत्र न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नव्याने अर्ज करावा असे आदेश दिले. त्यानुसार संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी सलमान खान सत्र न्यायालयात हजर झाला. आणि अवघ्या दहा मिनिटातच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करत ५ वाजून ४१ मिनिटांनी ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळवून बाहेरही पडला आणि घराच्या दिशेने रवाना झाला.

सलमान खानच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ अमित देसाई यांनी युक्तिवाद केला तर सरकारच्या वतीने अॅड. संदीप शिंदे यांनी बाजू मांडली. सुमारे दोन तास चाललेल्या या सुनावणीदरम्यान सलमान खान न्यायालयात उपस्थित नव्हता, मात्र त्याची मोठी बहिण अलवीरा ही कामकाजाच्या सुरुवातीपासूनच उपस्थित होती. ‘अनेक प्रकरणांत लोक शिक्षा पूर्ण सजा भोगतात आणि नंतर उच्च न्यायालयात निर्दोष सुटतात,’ असे न्या. ठिपसे म्हणाले. न्यायालयाच्या निकालानंतर सलमानच्या घरासमोर चाहत्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला. दरम्यान सलमानच्या एका चाहत्याने न्यायालयाच्या आवाराबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले.

तो पळून जाणार नाही : न्या.ठिपसे
‘खटल्याच्या संपूर्ण सुनावणीदरम्यान सलमान जामिनावर होता. अपिलाची सुनावणी होईपर्यंत त्याला तुरुंगात ठेवले पाहिजे, असे हे प्रकरण नाही. जामीन दिला तर सलमान पळून जाईल, असेही नाही. मग अपील प्रलंबित असेपर्यंत त्याचा अधिकार का हिरावून घ्यायचा? ’
- न्या. अभय ठिपसे, मुंबई उच्च न्यायालय

२.५४ लाख कच्चे कैदी तुरुंगात
शिक्षा झाल्यानंतर सलमान खानला काही तासांतच जामीन मिळाला खरा; परंतु सामान्य माणूस किंवा गरिबांना न्यायदानाची प्रक्रिया एवढी सक्रिय नाही. देशभरात 2.78 लाख कच्चे कैदी जामीन मिळवण्यात अपयशी ठरल्याने तुरुंगात आहेत. देशातील 3.81 लाख कैद्यांपैकी 2.78 लाख कच्चे कैदी आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच 1.27 लाख जणांनाच शिक्षा ठोठावलेली आहे.

कोर्ट रूम क्रमांक 21
>न्या. ठिपसे सरकारी वकिलांना म्हणाले : सलमान तुरुंगात का जायला हवा? सात वर्षांहून कमी शिक्षेच्या प्रकरणात अपील स्वीकारलेले असेल तर शिक्षेला स्थगिती मिळते, हा साधा नियम आहे. या नियमाला बगल का देऊ पहात आहात? सलमान गाडी चालवत होता की नाही, यावर चर्चा करण्यास वाव आहे.
>सलमानचे वकील : अपघातावेळी गाडीत कमाल खानसह चार लोक होते. गाडी चालक अशोक सिंह चालवत होता. कमालचा जबाब नोंदवला; त्याची साक्ष नोंदवण्यात आली नाही.
>न्यायमूर्तींनी विचारले : कमाल खानची साक्ष का नोंदवण्यात आली नाही?
>सरकारी वकील : कमाल ब्रिटिश नागरिक आहे. तो चौकशीसाठी उपलब्ध नाही. गाडीत तिघेच होते. चौघांची थिअरी मीडियाची आहे.
>सलमानचे वकील : खालच्या न्यायालयाने रवींद्र पाटील यांना विश्वासार्ह साक्षीदार मानले. मात्र त्यांच्या जबाबात विसंगती आहेत.
>सरकारी वकील : घटनेचे प्रत्यक्षदर्शी रवींद्र पाटील सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात होते. त्यांच्या जबाबावर विश्वास ठेवायला हवा.
>सलमानचे वकील : प्रकरण अपघातात मृत्यूचे आहे, सदोष मनुष्यवधाचे नाही. तरीही सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४-२ नंतर लावले.
>न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांना विचारले : कलम ३०४-२ आधीच का लावले नाही?
>सरकारी वकील : सलमान त्याच परिसरात रहातो. रस्त्याच्या कडेला लोक झोपतात हे त्याला माहीत होते. तरीही त्याने गाडी चालवली. दारू प्यालेला असतानाही सलमानने गाडी चालवली. अपघात होऊ शकतो, हे त्याला माहीत होते.
पुढे वाचा, पोलिसांचा तपासच संशयाच्या भोव-यात