मुंबई - करोडाे चाहते लाभलेला बाॅलीवूडचा तारणहार सुपरस्टार अभिनेता
सलमान खान बुधवारी सकाळी वांद्रे येथील
आपल्या घरून हिट अँड रन खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी जेव्हा न्यायालयात जाण्यास निघाला तेव्हा ना त्याचे फॅन्स होते, ना कुणी त्याला चिअरअप केले, ना कोणी त्याला कमी शिक्षा व्हावी म्हणून प्रार्थना केली. केवळ माध्यम प्रतिनिधींच्या गराड्यात आपल्या कुटुंबीयांसह सलमान पावणेदहा वाजता घरातून चूपचाप बाहेर पडला आणि सरळ न्यायालयात हजर झाला.
सलमानला बुधवारी ११ वाजता मुंबई सत्र न्यायालयात हजर व्हायचे होते. त्यामुळे मंगळवारी रात्रीच जम्मू आणि काश्मीरमधील चित्रीकरण संपवून सलमान घरी परतला होता. सलमान घरी येताच माध्यम प्रतिनिधींनी त्याच्या अपार्टमेंटसमोर डेरा टाकला होता.
काँग्रेसचे स्थानिक माजी आमदार बाबा सिद्दिकी सलमानचे खास मित्र आहेत. सकाळी सर्वप्रथम सिद्दिकी यांचे गॅलॅक्सीवर आगमन झाले. थोड्या वेळाने अभिनेता अरबाज खान, सलमानची सख्खी बहीण अल्विरा अग्निहोत्री आली. काही वेळाने अरबाज व बाबा सिद्दिकी बाहेर पडले.
गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी होती. झाडावर, भिंतीवर, गेटवर मिळेल तिथे कॅमेरामन जागा पटकावून बसले होते. फॅन्सच्या मोठ्या गर्दीची शक्यता असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यात आणखी भर पडली होती खान कुटुंबीयांनी नेमलेल्या बाउन्सरची.
गॅलॅक्सीच्या आवारातील प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी कॅमेरामन्सची धडपड चालू होती. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अपार्टमेंटमधून सलमान कुटुंबीयांसह बाहेर पडला. सलमान पांढ-या रंगाच्या २७२७ क्रमांकाच्या बेन्झ गाडीत चालकाशेजारीच बसला होता. तर ‘अपघात झाला तेव्हा, आपणच गाडी चालवत होतो’, अशी साक्ष नोंदवलेला खान कुटुंबीयांचा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता. इतर दोन गाड्यांमध्ये बहिण अर्पिता व अल्विरा, भाऊ सोहेल, वडील सलीम खान होते.
सलमानच्या तिन्ही गाड्यांचा ताफा घराबाहेर पडला आणि सुसाट वेगाने न्यायालयाकडे निघाला. त्याच्या मागेपुढे माध्यम प्रतिनिधींच्या गाड्या पिच्छा पुरवत होत्या. सलमान बाहेर पडताच इतका वेळ आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली, गजबजलेली गॅलॅक्सी इमारत अगदी सुनीसुनी झाली.
पुढे वाचा, छोट्या सलमानची दबंगगिरी