आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case: Salman Khan Disturbed After Listening Verdict

शिक्षा ऐकताच 'दबंग' सलमान घामाघूम, चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि माध्यमांचा गदारोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खान प्रत्यक्ष न्यायालयात पोहोचला त्या वेळी त्याच्या व कुटुंबीयांच्या चेह-यावरचा तणाव स्पष्टपणे दिसत होता.
मुंबई - अभिनेता सलमान खान प्रत्यक्ष न्यायालयात पोहोचला त्या वेळी त्याच्या व कुटुंबीयांच्या चेह-यावरचा तणाव स्पष्टपणे दिसत होता. सलमानच्या चाहत्यांमध्येही निकालाविषयी उत्सुकता होती, तर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा कोर्टरूमबाहेर गदारोळ सुरू होता. सलमानला मेंदूचा आजार असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केल्यानंतर सलमानची चांगलीच पंचाईत झाली. शिक्षा ऐकल्यावर सलमानने कोर्टरूममधील खिडकी गाठली आणि कुटुंबीयांशी चर्चा सुरू केली.

हिट अँड रन प्रकरणाचा निकाल मुंबई सत्र न्यायालय सहा मे रोजी देणार असल्याने सकाळपासून प्रसार माध्यमांनी सलमानचे घर ते न्यायालयाचे आवार या दरम्यानचा प्रसंग टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या वेगवान दिवसातील काही क्षणचित्रे... सकाळी पावणेदहाच्या सुमारास सलमान खान सत्र न्यायालयात हजर राहण्यासाठी आपल्या वांद्रे येथील येथील घरातून बाहेर पडला. अवघ्या अर्ध्या तासात सलमान न्यायालयाच्या आवारात पोहोचला. न्यायालयाच्या आवारात सलमानच्या चाहत्यांची तुरळक गर्दी होती. तिथेच बाजूला श्रीलंकेचे माजी अध्यक्ष राजपक्षेंसाठी सलमान खानने प्रचार केल्याच्या निषेधार्थ तामिळी तरुणांची निदर्शने सुरू होती.
आपल्या गाडीतून उतरत सलमानने थेट चौथ्या मजल्यावरील ५२ क्रमांकाची कोर्टरूम गाठली. त्याच्यासोबत त्याचे भाऊ सोहेल, अरबाज खान, मेव्हणा अतुल अग्निहोत्री, दोन्ही बहिणी अल्विरा आणि अर्पिता, काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि काही जवळचे मित्र होते. सलमान खान वगळता बाकी सगळे जण कोर्टरूममध्ये असलेल्या बाकांवर जाऊन बसले. सलमान खान मात्र बाहेर व्हरांड्यात आपले वकील श्रीकांत शिवदे यांच्याशी चर्चा करत होता.
सव्वाअकराच्या सुमारास न्यायमूर्ती डी. डब्ल्यू. देशपांडे आपल्या जागेवर स्थानापन्न झाले. सलमानला हजर करण्याचा त्यांचा आदेश मिळताच गर्दीतून वाट काढत सलमान खान आरोपीसाठीच्या पिंज-यात जाऊन उभा राहिला. कामकाजाला सुरुवात होताच न्या. देशपांडेंनी सलमान खानच्या दिशेने पाहत सांगितले की, "तुमच्यावरील आरोप सिद्ध झालेले आहेत. घटनेच्या दिवशी तुम्ही नशेत तर होतातच, गाडीही तुम्हीच चालवत होतात आणि आपल्याजवळ त्या वेळी वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. त्यामुळे आम्ही तुम्हाला दोषी ठरवत आहोत.'

त्यानंतर यावर आपल्याला काही बोलायचे आहे का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी सलमान खानचे वकील श्रीकांत शिवदे यांना केली. त्यावर आपल्या अशिलाची बाजू मांडताना शिवदेंनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. आपल्या युक्तिवादात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारच्या गुन्ह्यात वेळोवेळी दिलेल्या कमी कालावधीच्या शिक्षांचे दाखले दिले. तसेच सलमान खानचे सामाजिक काम पाहता त्याला कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या युक्तिवादानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आपले मुद्दे मांडले. आरोपीचे सामाजिक काम आणि त्याने केलेला गुन्हा याचा परस्पर काहीच संबंध नाही. त्यामुळे कायदा मोडल्याची शिक्षा काय होते हे सर्वांना कळावे म्हणून सलमान खानला अधिकाधिक शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद घरत यांनी केला. दोन्हीकडचे युक्तिवाद दुपारी साडेबाराच्या सुमारास संपताक्षणी पाऊण तासानंतर आपण निर्णय देऊ, असे सांगत न्यायमूर्ती आपल्या दालनात निघून गेले. त्यानंतर तासाभराने कामकाज सुरू झाल्यानंतर फक्त पाचच मिनिटांत न्या. देशपांडेंनी सलमान खानला शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकताच सलमान खान हतबल होऊन मागे वळला आणि कोर्टरूमच्या खिडकीपाशी गेला. तिथे मग त्याचे भाऊ आणि इतर मित्रमंडळी तसेच सलमान खानचे वकील यांची काही काळ चर्चा सुरू होती.

पुढे वाचा, शिक्षा सुनावण्यापूर्वी काय झाला युक्तिवाद?