मुंबई - अभिनेता सलमान खानचा सहभाग असलेल्या हिट अँड रन प्रकरणाची अंतिम सुनावणी ३० जुलैपासून उच्च न्यायालयात सुरू होणार आहे. दरम्यान, सलमानचे वकील अमित देसाई यांनी ही सुनावणी ३ ऑगस्टपासून घेण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.
६ मे रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणात सलमानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत सलमानला जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान सलमानच्या वकिलांनी एका प्रकरणाचा हवाला देत सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. २००२ मध्ये सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सलमानवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली : हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातून दुसरीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी करणारी सलमानची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व सलमानचा पोलिस अंगरक्षक रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी याचिका दाखल केली होती. पाटील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. सलमानच्या बाजूने राज्यातील सर्व यंत्रणा असल्याचा आरोप पाटील यांच्या कुटुंबीयांनी याचिकेत केला. मात्र, युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.