आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अनेक घोषणांचा पाऊस पाडत कार्यतत्परतेचा आव आणणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पोलिसांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, राज्यात सुरू असलेले डान्स बार आणि महिला भाविकांना धक्काबुक्की करणार्या लालबागच्या राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अजूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याने हे सिद्ध होत आहे.
राज्यातील महिलांना रात्री सुरक्षा देण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. ‘डान्स बारमध्ये काम करणार्या मुलींनाही सुरक्षा देणार का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पाटील म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईतील बार रात्री 9.30 वाजता बंद होतात. मात्र, त्यांच्यात अखत्यारीतील पोलिस दलातील एका अधिकार्याने मात्र प्रस्तुत प्रतिनिधीला डान्स बार रात्री उशिरापर्यंत चालतात, हे प्रत्यक्ष नेऊन दाखवून दिले.
आयुक्तांना दिलेले आदेशही डावलले
लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात अनेक महिला भाविकांशी उर्मट वर्तन केले होते. यात एका महिला पोलिसाचाही समावेश होता. माध्यमांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले होते. त्याची आठवण करून दिली असता गृहमंत्र्यांनी कारवाई केल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र प्रत्यक्षात संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्याला दूरध्वनीवरून विचारणा केली असता कारवाई झालीच नसल्याचे सांगण्यात आले. यावरून गृहमंत्र्यांचे आदेश पोलिस किती ‘गांभीर्या’ने घेतात याची प्रचिती येते.
आबा अकार्यक्षम गृहमंत्री : तावडे
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले, आर. आर. पाटील हे आतापर्यंतचे सगळ्यात अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. मुंबईतील वरिष्ठ अधिकार्यांची पदे दिल्लीतील आदेशानुसार भरली जात असल्याने त्यांचे कोणी ऐकत नाही. अहमद पटेल, प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांच्या सांगण्यावरून डीजी आणि आयुक्तांच्या नेमणुका होतात. दुसरीकडे, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तुरुंगात कैद्यांवर हल्ले होतात. आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जातात. यावरून गृहमंत्री केवळ घोषणा करण्यातच आघाडीवर असल्याचे दिसून येते.
उशिरापर्यंत डान्स बार सुरू
अंधेरी येथे अनेक डान्स बार आहेत. या ठिकाणी लाखो रुपये उधळले जातात. प्रस्तुत प्रतिनिधीला रात्री अकरा वाजता एक पोलिस अधिकारी डान्स बारमध्ये घेऊन गेला. तेथे 12-15 मुली डान्स करीत होत्या. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. रात्री उशिरा बाहेर आल्यानंतर पाहिले तर त्या बारसमोर पोलिसांची गाडी उभी होती आणि गाडीतील पोलिस बार मालकाशी गप्पा मारत होते. गृहमंत्र्यांना हे ठाऊक नसावे म्हणजे आश्चर्यच म्हणावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.