आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homeminister Devendra Fadanvis Talk On Crime & Security

पोलिस यंत्रणा सक्षम करून गुन्हेगारीला आळा घालणार- गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व प्रकारच्या गुन्हेगारीबाबत 'झिरो टॉलरन्स' ठेवण्यात येईल, त्याचप्रमाणे येत्या पाच वर्षात पोलीस यंत्रणा पूर्णपणे सक्षम करून गुन्हेगारीला आळा घालण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. पोलीस दलात बेशिस्त आणि वरिष्ठांचा अनादर सहन केला जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे मित्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आज नियम 293 अन्वये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सभागृहात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री बोलत होते. आमदार विजय वडेट्टीवार यांनी ही चर्चा उपस्थित केली होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या पाच वर्षात राज्यातील गुन्हेगारीत लक्षणीयरित्या घट आणली जाईल. तसेच समाजकंटकाना कायद्यानुसार कठोर शासन केले जाईल. जामीन मिळालेला असताना देखील संबंधित व्यक्ती वारंवार गुन्हे करीत असेल तर अशा प्रकरणांमध्ये सातत्याने पाठपुरावा करून कायद्याचे राज्य आहे, हे सिद्ध करून गुन्हेगारीला संपविण्यात येईल. गुन्हे वाढले याहीपेक्षा गुन्हेगारी वाढणे जास्त चिंताजनक आहे. शिक्षा होत नसल्याने आरोपी निर्ढावतात. गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण कमी असणे ही आपल्यासाठी निश्चितच चिंतेची बाब असून ज्या गुन्ह्यामध्ये पुरेसे पुरावे आहेत, ज्याची योग्य चौकशी झाली आहे, अशा खऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीतच चार्जशीट दाखल झाले पाहिजे असे मी निर्देश दिले आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले.
गृहमंत्री फडणवीस यांनी काय-काय महत्वाची पावले उचलली आहेत पोलिस व गुन्हेगारीविषयक...
- अपराध सिध्दीचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याने प्रत्येक जिल्ह्यात प्रोसिक्युटरचे पॅनेल स्थापन करण्यात येतील.
- चौकशी दरम्यान योग्य कायदेशीर मदत, चौकशी अधिकाऱ्यास पारितोषिके.
- गुन्ह्यांचा तपास शास्त्रशुद्ध पद्धतीनेच व्हायला हवा यासाठी प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयात फॉरेन्सिक युनिट्स निर्माण करण्यात येतील.
- पोलीस ठाण्यांनी सर्व गुन्हे नोंद करण्याचे आदेश, कुठल्याही परिस्थितीत पोलीस ठाण्यांनी झालेल्या तक्रारींची नोंद केलीच पाहिजे
- खटले सुरु असतांना त्यावर देखरेख करणारी एक सशक्त व्यवस्था देखिल आम्ही निर्माण करीत आहोत.
- राज्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी वचनबध्द
- महिलांवरील तसेच दुर्बलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी जीपीएस असलेल्या वाहनांद्वारे गस्त
- अत्याचार झालेल्या महिलेचे किंवा ज्येष्ठ नागरिकांचे, मुलांचे समुपदेशन करण्यासाठी मदत केंद्रे.
- दलित अत्याचारांचे गुन्हे अधिक गंभीरपणे घेणार
- दलितांवरील अत्याचार रोखण्यामध्ये पोलिसांना मदत करणाऱ्या आणि असे गुन्हे शाबित करण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या नागरिकांस 'महात्मा फुले पारितोषिक' देणार.