आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅलोपॅथीच्या औषधास डॉक्टरांना मिळणार मुभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- होमिओपॅथी कायद्यातील ‘ओन्ली’ शब्द हटवण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. या निर्णयाने राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्यास मुभा मिळू शकेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री डी. पी. सावंत यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावंत म्हणाले, आझाद मैदानावर राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरू द्यावीत आणि होमिओपॅथी कायद्यातील ‘ओन्ली’ शब्द हटवावा अशा त्यांच्या मागण्या आहेत. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याची मान्यता मिळताच तो मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल, अशी माहिती सावंत यांनी दिली. भाजपचे पांडुरग फुंडकर यांनी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या डॉक्टरांची मंत्र्यांनी भेट घ्यावी अशी सूचना केली.

डॉक्टरांची वसतिगृहे होणार चकाचक

सरकारी व महापालिका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांचे नूतनीकरण करण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. अलका देसाई, अशोक जगताप यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुंबईतील सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना कामाच्या वेळेपेक्षा अधिक काम करावे लागते. अपुरी विश्रांती आणि कामाचा ताण यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा देसाई यांनी मांडला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. त्याकरिता योग प्रशिक्षण, तणावमुक्तीसाठी करमणुकीची साधने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

शीव रुग्णालयातील डॉक्टरला झालेला संसर्ग गंभीर प्रकरण आहे. एखाद्या डॉक्टराला संसर्ग झाल्यास त्याची सोयीच्या जागी बदली करण्यात येईल. तसेच अशा डॉक्टरांना सर्व उपचार पुरवण्यात येतील, अशी माहिती डॉ. गावित यांनी दिली. सध्या एका खोलीत दोन-तीन डॉक्टर राहतात. यापुढे प्रत्येक डॉक्टरला स्वतंत्र खोली देण्यात येईल. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील जुन्या खाटा बदलण्यात येतील. तसेच वसतिगृहांचे नूतनीकरण करण्याची ग्वाही डॉ. गावित यांनी दिली.
डॉक्टरांची तपासणी
सर्व निवासी डॉक्टरांची त्यांच्या नेमणुकीनंतर दर तीन महिन्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. गावित यांनी दिली.
उपचारासाठी फंड
सरकारी रुग्णालयात सेवा बजावत असलेल्या निवासी डॉक्टरांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र निधी स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गावित यांनी दिली. डॉ. समिधा खंदारे या ‘शीव’ रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांना एमडीआर क्षयाची काही दिवसांपूर्वी लागण झाली होती. त्यांचा नुकताच मृत्यू झाला आहे.