आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूकांडातील दाेषींना फाशीसाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गावठी विषारी दारूची विक्री करून १०२ जणांचा बळी घेणारा मुख्य आराेपी आतिक याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दिल्लीत जाऊन अटक केली. दरम्यान, या अवैध दारू विक्रेत्यांवर ‘एमपीएडी’ कायद्यानुसार कठोर कारवाई करणार असून दाेषींना फाशीची शिक्षाच द्यावी, अशी विनंती राज्य सरकार न्यायालयाकडे करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

मुंबईच्या मालाड मालवणी येथे विषारी दारूमुळे १०२ जणांचा मृत्यू झाला. मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत या मुद्द्यावर चांगलीच चर्चा झाल्याची माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. अवैध दारू गाळणार्‍यांवर पोलिस कारवाई करतात, परंतु दारू गाळणे बंद झालेले नाही. नशा येण्यासाठी दारूत सर्रास केमिकल मिसळले जाते, स्वस्तात चांगली नशा देणारी दारू मिळत असल्याने गरीब लाेक ही दारू घेतात आणि त्यातून मालवणीसारख्या घटना घडतात. त्यामुळे अवैध दारू गाळणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असा सूर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी काढला. तसेच मालवणी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही काही मंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, अवैध दारू गाळणार्‍यांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. एमपीडीएमध्ये कठोर कारवाईची सोय आहे. परंतु मालवणी प्रकरणात फाशीची शिक्षा देण्याची विनंती करता येईल का याचा विचार राज्य सरकार करीत आहे.’

मुख्य सचिवांची समिती : ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव परदेशात आहेत. ते आल्यानंतर अन्य सदस्यांची आणि अहवाल देण्याची कालमर्यादा ठरवण्यात येईल. राज्यभरातील अवैध दारू धंद्याचा अभ्यास करून समिती अहवाल देईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.