आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हूक’ देणार मोबाइलवर चित्रपटांचा खजिना, योजनेसाठी सोनी, वॉर्नर ब्रदर्स आणि सिंगटेल एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी चित्रपटांना आता सुगीचे दिवस असल्याचे चित्र दिसत आहेत. व्हिडिओ ऑन डिमांडच्या क्षेत्रात परदेशात लोकप्रिय आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या हूक वेबसाइटने आता भारतातही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. हूक या वेबसाइटवर शेकड्यांनी मराठी चित्रपट उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सिंगटेलचे सीईओ संबा नटराजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

नटराजन म्हणाले, भारतातील प्रेक्षकांची चित्रपटांची आवड लक्षात घेऊन त्यांना कधीही चित्रपट पाहता यावा यासाठी आम्ही भारतात पाऊल ठेवत आहोत. विशेष म्हणजे यासाठी वॉर्नर ब्रदर्स आणि सोनी पिक्चर्सने आमच्याबरोबर करार केला आहे. आमच्या कंपनीत चित्रपट क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी भागीदारी केली आहे. या वेबसाइटवर सुमारे दहा हजारच्या वर इंग्रजी आणि हिंदीतील चित्रपट असून काही लोकप्रिय मालिकांचाही समावेशही आहे. इंग्रजी आणि हिंदीच नव्हे, तर भारतीय भाषांवरही आम्ही विशेष लक्ष दिलेले आहे. मराठी, तामीळ, तेलुगु, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषांमधील जवळ-जवळ पाच हजार चित्रपट आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. यामध्ये मराठीतील जुन्या गाजलेल्या चित्रपटांसोबत पुरस्कारप्राप्त चित्रपटांबरोबरच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपर्यंत पाचशेच्या वर चित्रपट आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत, असे नटराजन यांनी सांगितले.

महिना १९९ रुपयांत अनलिमिटेड
जून महिन्यापासून हूक भारतात कार्यरत होणार असून यासाठी प्रत्येक महिन्याला फक्त १९९ रुपये आकारण्यात येणार आहेत. या एक महिन्यात अनलिमिटेड डाऊनलोडची सोय असून ऑफलाइन चित्रपट पाहण्यासाठी पाच चित्रपट एका वेळेस डाऊनलोड करून नंतर ऑफलाइन पाहता येणार आहेत. हे पाच चित्रपट पाहून झाल्यानंतर ते डिलीट करून आणखी पाच चित्रपट डाऊनलोड करता येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये जाहिराती नसल्याने प्रेक्षकांना आपल्या आवडत्या चित्रपटाची मजा बाधा न येता घेता येणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...