आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलांना नवीन जीएसटीनुसार आकारणी करणे बंधनकारक; गिरीष बापट यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हॉटेलमधील जीएसटी सरसकट ५ टक्के करण्यात आला असून नवीन दरपत्रक १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. जे हॉटेलमालक ग्राहकांकडून जास्त पैसे उकळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केली. हॉटेलमधील दरपत्रक नवीन दरांच्या उल्लेखासह आता ग्राहकांना द्यावे लागेल.  

केंद्र सरकारने जीएसटीची नवीन रचना केली आहे. नवीन रचनेनुसार हॉटेलमध्ये आता सरसकट ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार असून जीएसटी लागू होण्याआधी व्हॅट होता. हॉटेलचे दरपत्रक हे व्हॅटसह होते. जीसटी लागू झाल्यानंतर हॉटेलचालकांनी व्हॅट वगळून नवीन दर लागू करायला हवे होते.मात्र अनेकांनी तसे केले नाही.  आधीचा दर अधिक जीएसटी अशी बिल आकारणी करण्यात येत होती.मात्र आता सरकारने हॉटेलमध्ये सरसकट ५ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे हॉटेलमालकांना आधीचा व्हॅट वगळून नवीन दरपत्रक छापावे लागणार आहे. हे दरपत्रक छापीलच असणे बंधनकारक आहे. हाताने लिहिलेले दर आता चालणार नाहीत.  १५ नोव्हेंबरपासूनच हे नवीन दर अंमलात आणणे बंधनकारक असणार आहे. हॉटेलमध्ये जीएसटी क्रमांक दर्शनी भागावर लिहिणे देखील बंधनकारक असणार आहे. जे दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही बापट यांनी दिला. 

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
जे हॉटेलचालक नियमांनुसार दर आकारणार नाहीत त्यांच्या विरोधात ग्राहकांना आता थेट तक्रार करता येणार आहे.१८०० २२५९०० या जीएसटी हेल्पलाईन नंबरवर ग्राहक तक्रार करू शकतात. जनतेनेही आता जागृत होउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 
हॉटेल व्यावसायिकांविरोधात तक्रार करावी, असे आवाहनही बापट यांनी या वेळी केले.
 
एमआरपीवर टॅक्स लावता येणार नाही 
ज्या पॅकेटबंद वस्तूंवर  छापील एमआरपी असते त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त टॅक्स लावता येणार नाही. कारण एमआरपी म्हणजे अधिकतम रिटेल किंमतीत टॅक्स अंतर्भुत असतो. याचबरोबर ज्या वस्तूंचे पॅकेजिंग आधीच झाले आहे त्यांच्यावर नवीन कमी झालेल्या सुधारित किंमतींचे स्टीकर लावावे लागणार आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...